गावकरी जावई, अन्‌ भटजी झाले सासरे...

विलास कुलकर्णी
सोमवार, 28 मे 2018

राहुरी फॅक्‍टरी (नगर) : गावकरी झाले जावई. गावाचे भटजी झाले सासरे, असे चित्र गुहा (ता. राहुरी) येथे पहायला मिळाले. 108 दाम्पत्यांची पूजा, त्यांना तेरा वस्तूंचे दान. संपूर्ण गावकऱ्यांना मिष्टान्न भोजन, असे अधिक मासाचे पुण्यकर्म सोमनाथ कुलकर्णी यांनी केले. 

राहुरी फॅक्‍टरी (नगर) : गावकरी झाले जावई. गावाचे भटजी झाले सासरे, असे चित्र गुहा (ता. राहुरी) येथे पहायला मिळाले. 108 दाम्पत्यांची पूजा, त्यांना तेरा वस्तूंचे दान. संपूर्ण गावकऱ्यांना मिष्टान्न भोजन, असे अधिक मासाचे पुण्यकर्म सोमनाथ कुलकर्णी यांनी केले. 

व्यतिपात, शनिप्रदोष, द्वादशी असा अधिक मासातील दुग्धशर्करा योग कुलकर्णी गुरूंनी शनिवारी (ता. 26) साधला. घरोघर आमंत्रणे दिली. हनुमान मंदिरात 108 दाम्पत्यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा केली. महिलांची ओटी भरून दान व वाण दिले. डाळबट्टी, साजूक तूप, बदामाचा गोडाचा शिरा, पुलाव, पापड, चटणी अशी मेजवानी ठेवली. महिला व पुरुषांच्या स्वतंत्र पंगती केल्या. जोडीला सुश्राव्य भक्तिगीतांचा कार्यक्रम ठेवला. रात्री साडेसात ते अकरापर्यंत पंगती उठल्या. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन दाम्पत्यांनी मिष्टान्नाचा आस्वाद घेतला. ब्राह्मण कधी सत्यनारायण पूजा व अन्नदान करीत नाहीत हा अपप्रचार सोमनाथ व सीमा कुलकर्णी या दाम्पत्याने खोडला. पंचक्रोशीतील ब्रह्मवृंद या धोंड्याला आवर्जून उपस्थित राहिले. 

ब्राह्मणाला दान करण्याची आमची संस्कृती. इथे ब्राह्मणाने गावाला धोंडा दिला. विष्णू भगवंताचा महाप्रसाद म्हणून आम्ही तो स्वीकारला. 
- बाळकृष्ण कोळसे, ग्रामस्थ, गुहा. 

माझ्यासह गावातील सर्व मुस्लिम समाजाने भोजन केले. गुरूंनी सामाजिक एकतेचे दर्शन घडविले, असे कार्यक्रम नियमित घडले पाहिजेत. 
- शौकतअली सय्यद, ग्रामस्थ, गुहा. 

प्रथमच गावधोंडा केला. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यापुढे दर तीन वर्षांनी अधिक मासात गावधोंडा करण्याचे ठरविले आहे. 
- सोमनाथ कुलकर्णी, गुहा. 

Web Title: villagers become son in law and bhatji becomes father in law