विसापूरला ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव

दीपक कच्छवा
रविवार, 8 जुलै 2018

विसापूर (ता.चाळीसगाव) येथील तांड्यावर आज झालेल्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्यात आला. यावेळी राईनपाडा येथील घटनेचा संदर्भ देऊन ग्रामस्थांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले.
 

मेहुणबारे (चाळीसगाव) - विसापूर (ता.चाळीसगाव) येथील तांड्यावर आज झालेल्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्यात आला. यावेळी राईनपाडा येथील घटनेचा संदर्भ देऊन ग्रामस्थांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले.

विसापूर तांडा येथील ग्रामसभेला सरपंच समाधान राठोड अध्यक्षस्थानी होते. गावासह परिसरात गावठी दारू सर्रासपणे विकली जात असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकाराकडे, राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने तसेच महिलांची मागणी लक्षात घेता दारूबंदीचा सर्वानुमते ठराव झाला.

सरपंच राठोड यांनी यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. बैठकीला उपस्थित मेहुणबारे पोलिस ठाण्याचे हवालदार एस. के. कुंभार यांनी सोशल मीडियावर कुठलाही मेसेज टाकताना खात्रीपूर्वक टाकावा, असे सांगितले. उपसरपंच प्रकाश राठोड, विजय राठोड, गोकुळ चव्हाण, हाटेसिंग राठोड, विनोद राठोड, ऋषिकेश राठोड, संतोष जाधव, यशवंत राठोड, ग्रामसेवक प्रकाश तिरमली व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: visapur grampanchayat pass the bill against wine