हे होते मतदारांच्या मनात...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

नाशिक महापालिका व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदारांचा कल, मतदान करताना त्यांना महत्त्वाचे वाटलेले विषय, नोटाबंदी, पारदर्शकता, सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील कौल आदी २२ मुद्द्यांवर ‘सकाळ’ने सर्वेक्षण केले. मतदारांनी पक्षाच्या उमेदवाराला पसंती दिल्याचे, प्रादेशिक अस्मिता फार महत्त्वाची वाटत नसल्याचे दिसले. बहुसंख्य मतदारांना मतदानयंत्रामध्ये घोटाळा झाल्याचे वाटत नाही; पारदर्शकतेचा मुद्दाही फार आकर्षित करणारा वाटला नाही. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत असंतोष, शेतमालाच्या भावाबाबत नाराजी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधक म्हणून अपयशी असल्याचेही मतदारांना वाटते.

नाशिक जिल्ह्यातील मतदारांच्या मनात नेमके काय होते, हे शोधण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ने केला. त्यासाठी निवडणूक झालेल्या प्रत्येक गटातील काही मतदारांची मते २२ मुद्द्यांच्या प्रश्‍नावलीने अजमावली. जिल्हा परिषद निवडणुकीत ३० टक्के तर महापालिका निवडणूकीत ५२ टक्के मतदारांनी पक्ष हा महत्त्वाचा घटक मानला. पण पक्षाचा कार्यक्रम तुलनेने कमी मतदारांना महत्त्वाचा वाटला. तो पाहणारे मतदार जिल्हा परिषदेत ११ टक्के तर महापालिका निवडणूकीत १५ टक्के आहेत. उमेदवाराची पार्श्‍वभूमी पाहून मतदान करणारेही जिल्हा परिषदेत २८ टक्के  तर महापालिकेत ४९ टक्के आहेत. जात-धर्म आणि पैसे याला फारसे महत्त्व कोणीच दिले नाही. मतदारांसाठी तो दुर्लक्षणीय मुद्दा आहे, हे चित्र आशादायक!

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकात ६२ टक्के मतदारांना परिवर्तन होऊ नये, दोन्हीही काँग्रेसच्या बाजुने कौल द्यावा असे वाटले. महापालिका निवडणुकीत शहरी ५६ टक्के मतदारांना परिवर्तन व्हावे असा कौल दिला आहे.

निकालानंतर सर्वाधिक गाजलेला मुद्दा म्हणजे मतदानयंत्राबाबत घेतलेला आक्षेप. त्यावरून राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रारी करण्यात आल्या. यंत्रात घोटाळा केल्याचा आरोप भाजपवर करण्यात आला. ग्रामीण मतदारांना याबाबत काय वाटते? हे पाहणीत विचारण्यात आले. तब्बल ८२ टक्के मतदारांना असा काही घोटाळा असण्याची शक्‍यता मुळीच वाटत नाही.

मुंबईत भाजप-शिवसेना युती फिसकटल्यानंतर ‘कारभारातील पारदर्शकता’ चर्चेत आली. हा मुद्दा केवळ मुंबईपुरताच न राहता ग्रामीण मतदारांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न झाला. ‘पारदर्शकता हा मतदानावर प्रभाव टाकणारा मुद्दा होता काय?’ असे मतदारांना विचारण्यात आले. तथापि ग्रामीण भागात ६३ टक्के तर शहरी भागात ६७ टक्के मतदारांना तो प्रभाव टाकणारा मुद्दा वाटला नाही. अन्य मतदार मात्र त्याच्याशी सहमत होते. प्रचारात मोठ्या प्रमाणात आलेला विषय नोटाबंदी. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारातही विरोधकांनी नोटाबंदीवर कठोर टीका केली होती; पण मतदारांनी महापालिकेत भाजप तर जिल्हा परिषदेत शिवसेना व राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिला.

Web Title: Vote ki baat Nashik