
Market Committee Election : तळोदा बाजार समितीसाठी 30 एप्रिलला मतदान
तळोदा (जि. नंदुरबार) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २७) प्रसिद्ध केला. (voting for taloda Bazar Committee on 30 April nandurbar news)
त्यानुसार तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान ३० एप्रिलला होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यात आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती वर्तुळातील राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. त्यात सर्वच राजकीय पक्ष कोणती भूमिका जाहीर करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
नामनिर्देशनपत्रे २७ मार्च ते ३ एप्रिल २०२३ पर्यंत दाखल करता येणार आहेत. ५ एप्रिल २०२३ ला नामनिर्देशनपत्राची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत ६ ते २० एप्रिल अशी आहे.
हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार
निवडणूक कार्यक्रमात सहा दिवस नामनिर्देशनपत्रे भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना मिळणार आहेत, तर नामनिर्देशन मागे घेण्यासाठी तब्बल ११ दिवस मिळतील. त्यामुळे या ११ दिवसांत खऱ्या घडामोडी घडतील, असे बोलले जात आहे. येथील बाजार समितीत १८ जागा असून, एक हजार ७४ मतदार आहेत.
मात्र येथे संचालक म्हणून निवडून येण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना व नेत्यांना संधी देत असतात. त्यामुळे या वेळी बाजार समितीत कोणत्या पक्षाचे कोणते कार्यकर्ते व नेते नामनिर्देशनपत्रे दाखल करतात यावर तालुक्यात चर्चा रंगू लागल्या आहेत.