खैरे गल्लीत वाडा कोसळला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

बचावकार्यात अडचण
नाकील वाडा अरुंद बोळीत असल्याने बचावकार्यात अडचण येत होती. शिवाय तेथे मोठ्या प्रमाणावर काळोख असल्याने अग्निशमन विभागाने त्यांच्याकडील बॅटरीच्या प्रकाशात बचावकार्य सुरू ठेवले. काही वेळानंतर बॅटरीची चार्जिंगही उतरल्याने अडचण निर्माण झाली. बंद-चालू करत बॅटरीचा वापर करावा लागला.

जुने नाशिक - खैरे गल्ली येथील नाकील वाडा कोसळण्याची घटना बुधवारी (ता. १०) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. भद्रकाली पोलिसांसह अग्निशमन पथकाने वाड्यातील सहा जणांची सुटका केली. रात्री उशिरापर्यंत वाड्याचा धोकादायक भाग उतविण्याचे काम सुरू होते.

पावसाने खैरे गल्लीतील नाकील वाडा धोकादायक झाला होता. बुधवारी अचानक वाडा कोसळण्याचा आवाज झाला. वाड्यात कुणी राहात नसले तरी त्यास लागून असलेल्या काळे वाड्यात मात्र काळे कुटुंबीय राहात होते. नाकील वाड्याचा काही भाग वाड्याच्या मागील बाजूस कोसळला, तर काही भाग काळे वाड्यावर कोसळल्याने काळे कुटुंबीय त्यात अडकले. भद्रकाली पोलिस बिट मार्शल प्रवीण पगारे, भरत शिर्के, संजय पाटील व प्रकाश शिंदे काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काळे वाड्यात अडकलेल्या वेदिका अरविंद काळे (वय २७), मंगला शिवाजी काळे (वय ५३), तनिष्क अरविंद काळे, हर्षदा अरविंद काळे अशा चौघांची सुटका करीत त्यांना सुरक्षित स्थळी नेले.

अग्निशमन दलाने नाकील वाड्याच्या मागील बाजूस अडकलेल्या दोन वृद्ध महिलांची सुटका केली. दोन्ही विभागाच्या प्रयत्नांमुळे सहा जणांचे प्राण वाचले. रात्री उशिरापर्यंत वाड्याचा अन्य धोकादायक भाग उतरविण्यात आला. काळे वाडाही पूर्णपणे धोकादायक असून, तोसुद्धा कधीही कोसळण्याची शक्‍यता महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तशा सूचनाही काळे कुटुंबीयांना दिल्या. नाकील वाड्याचे मालक राजू नाकील सध्या विहितगाव येथे वास्तव्यास आहे. गेल्या दहा ते १२ दिवसांत सुमारे १३ वाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wada Collapse in Khaire Galli Accident