चार वाडे कोसळले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

शहरातील वाडे कोसळण्याचे प्रकार सुरूच असून, रविवारीही (ता. ४) चार वाडे कोसळले. तर काझीगढीवरील तीन घरे कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शहरात आठ दिवसांपासून संततधार सुरू आहे. रविवारीही त्यात वाढ झाल्याने शहरातील विविध भागांतील वाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.

जुने नाशिक - शहरातील वाडे कोसळण्याचे प्रकार सुरूच असून, रविवारीही (ता. ४) चार वाडे कोसळले. तर काझीगढीवरील तीन घरे कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शहरात आठ दिवसांपासून संततधार सुरू आहे. रविवारीही त्यात वाढ झाल्याने शहरातील विविध भागांतील वाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.

जुने नाशिकमधील म्हसरूळ टेक येथील कुंभकर्ण वाडा सकाळी आठच्या सुमारास कोसळला. वाड्यात कुंभकर्ण कुटुंबीयातील वृद्ध दांपत्य, त्यांचा मुलगा राहत होता. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. वाड्याचा आणखी काही भाग धोकादायक बनला आहे. शिवाय तिघेही निराधार असल्याने त्याना रंगारवाडा शाळेतील खोलीत स्थलांतरित करण्यात आले. दरम्यान, संभाजी चौकातील एका जुन्या वाड्याचा काही भाग रस्त्यावर कोसळला.

बोहरपट्टीतील जुन्या वाड्याचा भाग कोसळल्याने रस्त्यावर मातीचा ढिगारा कोसळला. पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी बोहरपट्टीत गर्दी केली होती. वाडा कोसळल्याचा आवाज झाल्याने नागरिकांची धावपळ झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

सायंकाळी पाचच्या सुमारास गोरेराम लेन येथील जुन्या वाड्याचा संपूर्ण भाग पत्त्याच्या इमल्यासारखा कोसळला. त्याठिकाणी जमा असलेल्या पावसाच्या पाण्यात अनेक युवक पोहण्याचा आनंद घेत असताना वाडा कोसळला. युवकानी तेथून पळ काढल्याने ते थोडक्‍यात बचावले. दुसरीकडे काझीगढीवरील धोकादायक अवस्थेत असलेले किरण गुरव, आसिफ सय्यद, सुनील शिरसाठ यांची घरे कोसळली. त्यांनी स्थलांतरित होण्याच्या निमित्ताने नातेवाइकाच्या घरांचा आधार घेतला. अनेक दिवासांपासून त्याना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न महापालिका कर्मचारी करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wada Collapse in Nashik City Rain Water