तीक्ष्ण हत्याराने वार करून वेटरचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जून 2019

नाशिक- पुणे महामार्गावरील चिंचोली फाट्यावर हरिओम गोकुळ या ढाब्यावरील एका वेटरवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी दुसऱ्या वेटरवर संशय असून, तो फरारी झाला. नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

नाशिक रोड - नाशिक- पुणे महामार्गावरील चिंचोली फाट्यावर हरिओम गोकुळ या ढाब्यावरील एका वेटरवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी दुसऱ्या वेटरवर संशय असून, तो फरारी झाला. नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

चिंचोली फाट्याजवळ बबन झाडे यांचा हरिओम गोकुळ ढाबा आहे. येथे ओमप्रकाश ऊर्फ सैराट व राजू हे दोघे वेटर म्हणून काम करतात. शुक्रवारी (ता. ३१) रात्री अकराच्या सुमारास श्री. झाडे कामकाज आटोपून निघून गेले. त्यानंतर नेहमीप्रमाणे ओमप्रकाश व राजू हे दोघे ढाब्यावरच थांबले. सकाळी सव्वाआठच्या सुमारास झाडे ढाब्यावर गेले असता, बाहेर पडद्यालगत त्यांचे मित्र संजय जाधव यांनी झाडे यांना कोणीतरी जखमी असल्याचे दाखविले. त्या ठिकाणी ओमप्रकाशच्या डोके, कपाळ, मान व हातावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याचे आढळले. झाडे यांनी शिंदे येथील टोलनाक्‍यावरील रुग्णवाहिका बोलावली व त्याला शासकीय रुग्णालयात  दाखल केले.

झाडे यांनी ढाब्यावर जाऊन तपासणी केली असता, ठिकठिकाणी रक्ताचे डाग आढळले. पुरावा नष्ट करण्यासाठी फरशीवरील रक्ताचे डाग पुसण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळले. मात्र, त्याचा साथीदार राजू (पूर्ण नाव माहीत नाही) दिसला नाही. त्याची कपड्याची बॅग व इतर साहित्य दिसले नाही. ढाब्याचा गल्ला तपासला असता, काही सुटे पैसे व इंडिका गाडीची चावी नसल्याचे दिसले. यावरून राजूनेच ओमप्रकाशवर हल्ला करत खून करून पळून गेल्याचा संशय आहे. याप्रकरणी झाडे यांनी पोलिसांत राजूविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waiter Murder Crime