कारागृहाच्या तटबंदीच्या भिंतीही ठेंगण्या!

jail
jail

जळगाव : जिल्हा कारागृहातून आज पहाटे दोन कच्च्या कैद्यांनी स्वयंपाक घराच्या मागील तटबंदीची 16 फूट उंच मुख्य भिंत भेदून पलायन केल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे पाचला दोघांना बॅरेकमधून काढून स्वयंपाक घरात कामाला जुंपण्यात आल्यावर संधी साधून दोघांनी पळ काढल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी कारागृहात दाखल झाले व चौकशी सुरू केली. 

जामनेर तालुक्‍यातील मूळ रहिवासी शेषराव सुभाष सोनवणे (वय 28) रवींद्र भीमा मोरे (वय 29) या दोघांना पिंपळगाव हरेश्‍वर पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. अटकेनंतर पोलिस कोठडी आणि नंतर दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्यावर 4 सप्टेंबर 2018 पासून दोघेही जिल्हा कारागृहात होते. 

अशी घडली घटना 
कारागृहात शेषराव सोनवणे (कैदी क्र. 2007) आणि रवींद्र मोरे (क्र. 2008) या दोघा कैद्यांना आज पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी कारागृह रक्षक बाळू बोरसे आणि हिरामण सोनवणे या दोघांनी नेहमीप्रमाणे बॅरेकमधून बाहेर काढले. दोघांना स्वयंपाक घरात घेऊन जात नेहमीची कामे दोघांना सोपवण्यात आली होती. रोज निमूटपणे सांगितलेली कामे ऐकणारे दोघे कच्च्या कैद्यांनी कारागृह आवारातील पहाटेचा शुकशुकाट आणि दोघेही सुरक्षारक्षक कार्यालयात गेल्याची संधी साधून स्वयंपाक घराच्या मागील तटबंदीची भिंत ओलांडून धूम ठोकली. 

...आणि शोधाशोध सुरू 
बराच वेळ झाल्यावर सुरक्षारक्षकांनी स्वयंपाक घराकडे जाऊन बघितले तर कोणीही आढळून आले नाही. दोघांचा शोध घेतल्यावर दोघांनी भिंत ओलांडून पळ काढल्याचे कळाल्यावर कारागृह अधीक्षक अनिल रघुनाथ वांढेकर यांना कळवण्यात आले. अधीक्षकांनी कारागृहात धाव घेत पाहणी केल्यावर वरिष्ठांना घडला प्रकार कळवला. जिल्हापेठ पोलिसांत दोघा कैद्यांच्या पलायना बाबत तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी शोध सुरू केला आहे. 

दिसायला बावळट पण चपळ 
गावात मिळेल ते मेहनतीची कामे अगदी बालवयापासून करीत असल्याने सडपातळ. मात्र, कसलेले शरीर.. बोलण्यात दोघेही शांत आणि सांगेल ती कामे ऐकणारी.. स्वयंपाकगृहात मदतनीस म्हणून दोघांना जबाबदारी देण्यात आली होती. दोन महिन्यांत येथील स्थितीचा आढावा घेत, कारागृह प्रशासनाच्या बेफिकीरीचा अभ्यास करून दोघांनी पहाटेच्या थंडीत शेकोट्यांच्या आसऱ्याला गेलेल्या सुरक्षारक्षकांच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत पळ काढला. 

दोघेही गावठी "स्पायडर-मॅन' 
शेषराव सोनवणे व रवींद्र मोरे दोघेही भिल्ल समाज बांधव सवयीप्रमाणे पोहण्यासह झाडावर चढण्यात पारंगत होते. उंचावर चढणे त्यांच्या अंगवळणी असल्याने विना सुरक्षारक्षक तटबंदीची भिंत त्यांच्यासाठी खुज्याच होत्या. स्वयंपाक घरात सोडल्यावर अवघ्या काही वेळात दोघांनी बाहेर पडत मागील तटबंदीची भिंत गाठून स्पायडर मॅनप्रमाणे चढत पलीकडे उड्या घेऊन पळ काढला. 

चौकशी अंती कारवाई 
घडल्या प्रकाराची माहिती कारागृह महानिरीक्षकांना कळवण्यात आली असून कैद्यांच्या पलायनाबाबत खात्यांतर्गत चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. 
- अनिल वांढेकर 
कारागृह अधीक्षक, जळगाव. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com