नाशिक - वणी बसस्थानकात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित

दिगंबर पाटोळे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

वणी (नाशिक) : येथील बसस्थानकावर रोडरोमिओेंसह पाकीट व सोनसाखळी चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचा तिसरा डोळा कार्यान्वीत झाल्याने बसस्थानकावरील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार आहे.

वणी (नाशिक) : येथील बसस्थानकावर रोडरोमिओेंसह पाकीट व सोनसाखळी चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचा तिसरा डोळा कार्यान्वीत झाल्याने बसस्थानकावरील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार आहे.

नाशिक- कळवण या राज्यमार्ग तर  सुरत - पिंपळगाव- शिर्डी या राष्ट्रीय मार्गावरील महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेजवळील वर्दळीचे प्रमुख बसस्थानक म्हणून येथील बसस्थानक ओळखल  जाते. साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तश्रृंगी गडावर भगवतीच्या दर्शनासाठी तर सप्तश्रृंगी मातेचीच भगिनी समजली जाणाऱ्या वणी गावातील जगदंबा मातेच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांचा राबता असतो. तसेच सापुतारा येेथील पर्यटनस्थळ, हतगडचा किल्ला, वणीजवळील अहिवंतवाडीचा किल्ला, धोडप किल्ला, दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र, मार्कंडेय पर्वत या ठिकाणांनाही भेटी देण्यासाठी भाविक व पर्यटक वणी येथून ये-जा करत असल्याने वणी बसस्थानकात कायम प्रवाशी व राज्य परीवहन महामंडळाच्या बसेसची वर्दळ असते.

येथील बसस्थानकातून कळवण व नाशिक आगाराच्या सुमारे चारशे बसेस, गुजरात राज्याच्या पन्नास आदीसंह सुमारे पाचशे बसेस दिवसभरात वणी बसस्थानकातून ये जा करतात. तसेच कळवण-सुरगाणा- चांदवड या तालुक्याच्या सिमे रेषेवर प्रमुख बाजारपेठेचे केंद्रा बरोबरच शैक्षणिकदृष्या मध्यवर्ती ठिकाण ही असल्याने वणी बसस्थानकात परीसरातील रहिवाशी तसेच महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी नियमितपणे येथे येतात.

बसस्थानकावर काही टवाळखोर, रोडरोमिओंचा सुळसुळाट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यीनींची होणारे छेडछाडीचे प्रकार तसेच बसमध्ये चढतांना उतरतांना गर्दीचा फायदा घेवून होणाऱ्या पाकिटमारी, सोनसाखळी सारख्या चोर्‍यांबरोबर रात्री बेरात्रीच्यावेळी बसस्थानकातील गुन्हेप्रवृत्तीचा वावराला आळा बसण्यासाठी कळवण आगारातर्गंत येणाऱ्या येथील बसस्थानकात राज्य परीवहन महामंडळाने खाजगी कंपनीच्या माध्यमातून चार उच्च सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. तसेच सीसीटीव्हीसाठी आवश्यक असलेली एलसीडी टीव्ही, इनव्हर्टरची सुविधा कार्यान्वीत करण्यात आली आहे. यामुळे बसस्थानक व परीसरातील अपप्रवृत्तींचा वावर तसेच महीला व युवतींमधील असुरक्षीतेची भिती कमी होण्यास मदत झाल्याने महिला, विद्यार्थीनी प्रवाशी यांच्यामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. 

असे असले तरी यंत्रणा बसवलेले बसस्थानकाचे कार्यालयाच्या खिडक्यांच्या फुटलेल्या काचा, खिळखिळे झालेले दरवाजे, रात्रीच्या वेळीचा अपूरा विद्युत प्रकाश यामुळे सुरक्षतेसाठी कार्यान्वीत केलेली सुरक्षतेसाठीची यंत्रणाच असुरक्षीत वाटू लागली आहे. तसेच येथील बसस्थानकात सकाळी साडे नऊ ते पाच या वेळेत असलेला एकमेव वाहतूक नियंत्रक, सांयकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत तसेच रविवारी पूर्ण दिवस बंद असणारे कार्यालय, तसेच रात्रीच्या वेळेस बसेस बसस्थानकात न येता बसस्थानका बाहेरूनच जात येत असल्यामूळे महामंडळाच्या तीसरा डोळ्याची नजर कुठपर्यंत पोहचते याबाबत प्रवाशांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे.

Web Title: wani bus stand covered by cctv