सप्तशृंगगडावर प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

वणी - उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता सप्तशृंगगडावर २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आज गडावर प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध महसूल विभागाने मोहीम राबविली. सहा व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करून दंडात्मक कारवाई केली आहे.

वणी - उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता सप्तशृंगगडावर २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आज गडावर प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध महसूल विभागाने मोहीम राबविली. सहा व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करून दंडात्मक कारवाई केली आहे.

गडावरील वाढता कचरा व प्लास्टिक प्रदूषणाच्या समस्येच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी एप्रिल महिन्यात चैत्रोत्सवापासून सप्तशृंगगडावर प्लास्टिक बंदीचा आदेश काढला होता. या वेळी गडावरील व्यावसायिकांना सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व ग्रामपंचायतीने प्लास्टिकचे डस्टबिन व भाविकांना कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिक बंदीविषयी जनजागृती करून स्वच्छता मोहीम राबविली होती. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ, ट्रस्टने संयुक्त स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र यास गडावरील व्यावसायिक व भाविकांकडून प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर काही प्रमाणात सुरूच राहिल्याने व्यावसायिकांना ग्रामपंचायतीने दिलेल्या नोटिसा वगळता कुठलीही कारवाई झालेली नाही, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या घोषणेनुसार महिन्यातील एकाही शनिवारी ग्रामस्वच्छता मोहीम राबविली गेली नव्हती.

दरम्यान, उद्या (ता. १९) गडावर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सव यात्रा तयारीची आढावा बैठक होणार असल्याने कळवणचे तहसीलदार कैलास चावडे व गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांनी गडावर प्लास्टिक बंदीसाठी अचानक मोहीम राबवीत हॉटेल, प्रसाद, पूजासाहित्य दुकानांची तपासणी केली. या वेळी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या सहा व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करून दंडात्मक कारवाई केली आहे. कारवाईची चाहूल लागताच अनेक व्यावसायिकांनी पिशव्या सापडणार नाहीत याची दक्षता घेतली. या वेळी ग्रामपंचायतीने व्यावसायिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करून व्यावसायिक व भाविकांमध्ये जागृती केली. कारवाईदरम्यान सरपंच सुमन सूर्यवंशी, ग्रामसेवक आर. बी. जाधव, उपसरपंच ललिता व्हरगळ, सदस्य गिरीश गवळी, राजेश गवळी,  विजय वाघ, संदीप बेनके, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: wani nashik news crime on plastic use