आई-वडिलांसह मुलाची निर्घृण हत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

कोकणगावातील घटना; मारेकऱ्यांचा शोध सुरू

कोकणगावातील घटना; मारेकऱ्यांचा शोध सुरू
वणी - कोकणगाव खुर्द (ता. दिंडोरी) येथे आई, वडील व मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना काल रात्री घडली. ही घटना कोकणगाव शिवारातील टॉवरचा माथा भागातील जगन्नाथ मुरलीधर शेळके यांच्या मळ्यातील घरात घडली. एकाच कुटुंबातील या तिघांची हत्या करण्यामागील कारण अद्याप समजले नसून अज्ञात आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

पोलिसांनी सांगितले, की मंगळवारी (ता.30) सोमनाथ शेळके व त्यांचे वडील जगन्नाथ शेळके, आई शोभा शेळके व भाऊ हर्षद शेळके या सर्वांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शेतात काम केले. त्यानंतर सोमनाथ हे हळदीच्या कार्यक्रमाला लखमापूर फाटा या ठिकाणी गेले. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री दहाच्या दरम्यान घरी कोकणगावला पोचले असता, त्यांच्या घराचे दार उघडे दिसले. घरातील विज दिवे चालू तर दूरचित्रवाणी संचाचा आवाज वाढलेला होता. सोमनाथ यांनी घरात प्रवेश केला असता त्यांना कोणीच दिसले नाही. त्यांनी स्वयंपाकगृहात डोकावून पाहिले असता त्यांचा भाऊ हर्षद हा उंबऱ्यावर पडलेला दिसला. त्यांच्या डोक्‍यातून रक्त वाहत होते. नंतर त्यांनी आई-वडिलांना आवाज दिला असता कोणीच होकारा न दिल्याने त्यांनी जवळच राहणारे चुलते व चुलत भाऊ यांना बोलावले. त्यांनी हा प्रकार बघून आई-वडिलांचा शोघ घेतला. वडील जगन्नाथ हे स्वयंपाकगृहाशेजारील खोलीत मृतावस्थेत आढळले. दुसऱ्या खोलीत आई शोभा ही मृतावस्थेत आढळली. झालेला प्रकार बघून सोमनाथ अबोल झाले. मृत तिघांच्या डोक्‍यात तिक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून आले. या घटनेबाबत पोलिस पाटील यांनी वणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात पाठविले.

Web Title: wani nashik news murder case