वरखेडे बॅरेज प्रकल्पाच्या कामाला वेग 

warkhade project
warkhade project

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वकांक्षी असलेल्या वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. या प्रकल्पाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. त्यादृष्टीने आवश्‍यक ती सर्व यंत्र सामुग्री या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली असून कामाला वेग आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पासंदर्भात दिल्ली येथे नुकतीच 135 वी सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीला तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा केंद्रीय सचिव यु. पी. सिंग अध्यक्षस्थानी होते. बैठकीत भारतातील मोठे व मध्यम योग्य अशा प्रकल्पांच्या पडताळणी व मान्यतेसंदर्भात चर्चा करण्यात आली. सिंचनासाठी व इतर महत्वाच्या बाबींसाठी उपयुक्त असलेल्या एकूण पाच प्रकल्पांवर चर्चा झाली. यात महाराष्ट्रातील एकमेव वरखेडे- लोंढे बॅरेजचा समावेश होता. बैठकीत तापी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एस. डी. कुलकर्णी उपस्थित होते. त्यांनी वरखेडे प्रकल्प हा कायमस्वरूपी अवर्षण प्रणव क्षेत्रात मोडणारा असल्याचे सांगितले. चाळीसगाव व भडगाव तालुक्‍यासाठी उपयुक्त असलेल्या या प्रकल्पामुळे 7 हजार 442 हेक्‍टर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्याला पर्यावरण व वन खात्याची मान्यता मिळाल्याची माहिती श्री. कुलकर्णी यांनी दिली. वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाच्या विदर्भ, मराठवाडा व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी असलेल्या बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत समाविष्ट असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. 

526 कोटीच्या प्रस्तावाला मान्यता 
तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत वरखेडे- लोंढे प्रकल्पावर चर्चा होऊन 526 कोटीच्या सुधारित प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. बैठकीला वरखेडे- लोंढे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पी. आर. मोरे, उप कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील उपस्थित होते. 

सिंचनाचा मोठा प्रकल्प 
वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्प चाळीसगाव व भडगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचाच नव्हे तर शेतीच्या सिंचनाचाही प्रश्‍न सुटणार आहे. या प्रकल्पावर वाळू , खडी पाणी जागेवरच उपलब्ध असल्याने शासनाचा हा खर्च वाचला आहे. सर्व आवश्‍यक ती यंत्र सामुग्री सध्या प्रकल्पावर आलेल्या आहेत. या कामासाठी पुरेल एवढी खडी उपलब्ध आहे.या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 2017-18 मध्ये वरखेडे-लोंढे धरणासाठी जलसंपदा विभागामार्फत उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक निधीची तरतूद करण्यात आली होती. 

आमदार उन्मेष पाटील यांचा पाठपुरावा 
आमदार उन्मेष पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून अर्थसंकल्पातील 40 कोटी व महामंडळाच्या शिल्लक निधीतून 15 कोटी असे एकूण 55 कोटींची भरीव तरतूद करून या प्रकल्पाला आजपर्यंतचा सर्वाधिक निधी मिळवून दिला. आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच या कामाला गती मिळाल्याचे दिसत आहे. 

असा मिळाला निधी :
2014- 15 ....... 10.24 कोटी 
2015- 16 ....... 19.54 कोटी 
2016- 17 ....... 13 कोटी व 15 कोटी (अतिरिक्त) 
2017- 18 ....... 40 कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com