शिंदीकरांची घागर "आखाजी'ला रिकामीच 

दीपक कच्छवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मेहुणबारे - पाणी टंचाईच्या दलदलीत अडकलेल्या शिंदी (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांवर आजच्या "आखाजी'च्या महत्त्वपूर्ण सणाला घागरी रिकाम्या ठेवण्याची वेळ आली. परिसरातील विहिरींना पाणीच नसल्याने ग्रामस्थांचे खूपच हाल होत आहेत. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून किमान सद्यःस्थितीत टॅंकर तरी सुरू करावे, अशी मागणी होत आहे. 

मेहुणबारे - पाणी टंचाईच्या दलदलीत अडकलेल्या शिंदी (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांवर आजच्या "आखाजी'च्या महत्त्वपूर्ण सणाला घागरी रिकाम्या ठेवण्याची वेळ आली. परिसरातील विहिरींना पाणीच नसल्याने ग्रामस्थांचे खूपच हाल होत आहेत. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून किमान सद्यःस्थितीत टॅंकर तरी सुरू करावे, अशी मागणी होत आहे. 

शिंदी येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अतिशय गंभीर बनला आहे. आजच्या "आखाजी' सणाला पूजेची घागर पाण्याने भरण्यासाठी ग्रामस्थांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागली. अनेकांनी तर अक्षरशः पाणी विकत घेऊन पूजेची घागर भरल्याचे दिसून आले. गावात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत असताना लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून तातडीच्या कुठल्याच उपाययोजना केल्या जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. 

टॅंकर सुरू करावे 
गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने पाण्याचे टॅंकर तरी सुरू करावे, अशी मागणी होत आहे. सद्यःस्थितीत महिलांचे पाणी आणण्यासाठी खूपच हाल होत आहेत. गावातील विहिरींनी तळ गाठला असून एक विहिरीत केवळ पाण्याचे डबके असल्याने त्यातून एक बादली पाणी भरण्यासाठी तब्बल वीस मिनिटे लागत असल्याचे महिलांनी रडकुंडीला येऊन सांगितले. या परिस्थितीत, काहींनी खासगी टॅंकरद्वारे पाणी विक्री सुरू केली असून, पन्नास रूपये टाकी याप्रमाणे ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना पैसे मोजावे लागत असल्याने गावात टॅंकर सुरू करावा, अशी मागणी होत आहे. 

फळबागा जगवणे कठीण 
पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असतानाच फळबागांनाही पाणी मिळणे कठीण झाले आहे. या भागातील मोसंबीच्या फळबागा पाण्याअभावी सुकू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बहुतांश शेतकरी आपल्या मोसंबीच्या बागा वाचविण्यासाठी पाण्याचे टॅंकर विकत घेऊन पाणी देत आहेत. या भागात मागीलवर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला होता. 

वलठाण धरणातून पाणी द्यावे 
गावाची पाणीपुरवठा योजनेची विहीर मोरदरा धरणात आहे. या धरणातच पाणी नाही. यामुळेच शिंदीच्या ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. प्रशासनाने सात किलोमीटर अंतरावरील वलठाण धरणातून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: water crisis in shindi chalisgaon