गिरणा परिसरातील फळबागा धोक्यात 

Girna Dam
Girna Dam

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘डाळिंबाचे होऊनी हाल लिंबूबाग ती उखडली, कुठून आणावे पाणी, विहीर तर सुकली....’ या कवितेच्या ओळींचा प्रत्यय सध्या गिरणा परिसरातील फळबागांकडे पाहिल्यानंतर येत आहे. चाळीसगावसह पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढतच चालल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट गडद होत चालले आहे. पाण्याअभावी फळबागा धोक्यात आल्या आहेत. पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना फळबागा वाचविण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे.

बोअरवेल व विहिरी कोरड्या पडल्यामुळे काही शेतकरी अक्षरशः टँकरने पाणीपुरवठा करून फळबागा जगवत आहेत. टँकरच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. सध्या दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

चाळीसगावसह पाचोरा व भडगाव तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, मोसंबी, सीताफळ, लिंबू, केळीसह फळबागांची लागवड केली आहे. एकट्या चाळीसगाव तालुक्यात जवळपास सात हजार हेक्टरवर फळबागांची लागवड झाली होती. सध्या निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा हताश झाला आहे. दुष्काळी परिस्थितीत फळबागा जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. मागीलवर्षी जून व जुलै या दोन महिन्यात चांगला पाऊस झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस कमी झाल्याने नदी नाल्यांना पाणीच आले नाही. परिणामी, खरिपासोबतच रब्बीचा हंगामही वाया गेला.अल्प पावसामुळे फळबागांवरही दोन 
महिन्यांपासून पाणीटंचाईचे संकट आले आहे. 

डोळ्यांसमोर जळतेय बाग
विहिरीतील पाणी तळाशी गेल्याने फळबागा कशा जगवाव्यात? हा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. हिरव्यागार दिसणाऱ्या बागा आता पाण्याअभावी जळताना पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. गिरणा परिसरातील ज्या ज्या गावांना गिरणा नदीचा काठ लाभला आहे, अशा गावांमध्येही फळबागा जगविणे कठीण झाले आहे. पाच वर्षांपासून गिरणा परिसरात पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले झाल्याने जमिनीतील पाण्याचे स्रोतही कमी झाला आहे. रात्रंदिवस चालणाऱ्या विहिरी अक्षरशः एका तासावर आल्या आहेत. गिरणा पट्टा सोडला तर इतर ठिकाणच्या सर्व विहिरी पंधरा ते वीस मिनिटांवर येऊन ठेपल्या आहेत. शेतकऱ्यांनी ऊस, केळी, उन्हाळी कांदा तर गुरांसाठी चारा लागवड केली आहे. यावर्षी हवामान खात्याने पाऊस कमी होण्याचे संकेत दिले आहेत. आताच अशी विदारक परिस्थिती निर्माण झाल्याने पुढे कसे होणार? याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. 

फळबागांसाठी विकतचे पाणी 
सध्याच्या संकटकाळात काही शेतकरी विकतचे पाणी घेऊन फळबागा जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. फळबागांसाठी टँकरचे पाणी विकत घेतले जात असून पाच हजार लीटरच्या टँकरसाठी साधारणपणे सहाशे रुपये खर्च येत आहे. मात्र, पाच हजार लीटर पाण्यावर काहीही होत नसल्याने वीस हजार लिटरपेक्षाही जास्त पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यासाठी दोन ते तीन हजार रुपये मोजावे लागतआहेत.अनेक गावांमध्ये फेब्रुवारीपासूनच टँकरचे पाणी विकत घेऊन फळबागांना दिले जात आहे. एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाईचे चित्र अधिकच भीषण झाले आहे. फळबागा जगवण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. फळबागांवर होणारा खर्च आवाक्याबाहेर जात असतानाही फळबागा जगवाव्या लागत आहे. ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची आहे, त्यांनी तर फळबागा सोडून दिल्या आहेत. पोटच्या मुलाप्रमाणे जतन केलेल्या फळबागा पाण्यावाचून जळतानाचे चित्र सध्या दिसत आहे. 

वीस वर्षे मिळते उत्पन्न 
फळबागांची लागवड केल्यानंतर साधारणपणे पाचव्या वर्षापासून उत्पादन मिळू लागते. फळबागांची व्यवस्थित निगा राखली, तर २० वर्षे फळबागांमधून उत्पादन मिळू शकते. मात्र, पाण्याअभावी फळबागा जळाल्यास फळबागेला जेवढी वर्षे झाली आहेत, तेवढी वर्षे शेतकरी पुन्हा मागे जातो. प्रत्येकवेळी नव्याने फळबाग लागवड करण्याचा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचा असतो. यामुळे फळबाग सुकू नये, 
ती हिरवी राहावी यासाठी शेतकरी धडपडत आहे. 

विहिरींच्या खोलीकरणाची कामे सुरू 
भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने सध्या क्रेन यंत्राच्या साहाय्याने गाळ काढण्यासह विहिरीतील खडक फोडण्याची कामे सुरू आहेत. मागील वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कपाशीला पाहिजे तसा भाव मिळाला नाही. चाळीत भरून ठेवलेला कांदा भावाअभावी चाळीतच सडला. ही परिस्थिती पाहता, बळीराजाला शेती नकोशी झाली आहे. शेतातील पिके वाचविण्यासाठी शेतकरी आतापासूनच विहिरींच्या कामाला लागले आहेत. काहींना विहिरीचे काम करुनही पाणी आले नाही. हातातील पैसा देखील खर्च झाल्याने बळीराजा हताश झाला आहे. त्यामुळे ‘माय खाऊ देईना आणि बाप भीक मागू देईना’ अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. 

तालुक्यातील फळबागांचे मार्च महिन्यातच पंचनामे करण्यात आले आहे. यासंदर्भातील पंचनाम्यांची माहिती आम्ही तहसील प्रशासनाकडे सादर केली आहे. यामुळे शासनाच्या धोरणानुसार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले जाईल. 
- सी. डी. साठे, तालुका कृषी अधिकारी, चाळीसगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com