नांदूर-मधमेश्‍वरमधून २४ हजार क्‍युसेक विसर्ग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

पावसाचा जोर कायम असून, दारणा, भावली धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांदूर-मधमेश्‍वर बंधाऱ्यातून दिवसभर २४ हजार क्‍युसेकने दारणेतून पाणी सोडण्यात येत होते. सायंकाळी हा विसर्ग कमी करून २३ हजार ९५९ क्‍युसेकने सुरू आहे. दरम्‍यान, इगतपुरीत १२६ मिलीमीटर पाऊस झाला, तर त्र्यंबकेश्‍वर, पेठ व सुरगाणा तालुक्‍यांत जोर कायम आहे.

नाशिक जिल्‍ह्यात इगतपुरीला १२६ मिलिमीटर पाऊस; ‘गंगापूर’ ७६ टक्के भरले
नाशिक - पावसाचा जोर कायम असून, दारणा, भावली धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांदूर-मधमेश्‍वर बंधाऱ्यातून दिवसभर २४ हजार क्‍युसेकने दारणेतून पाणी सोडण्यात येत होते. सायंकाळी हा विसर्ग कमी करून २३ हजार ९५९ क्‍युसेकने सुरू आहे. दरम्‍यान, इगतपुरीत १२६ मिलीमीटर पाऊस झाला, तर त्र्यंबकेश्‍वर, पेठ व सुरगाणा तालुक्‍यांत जोर कायम आहे.

संततधारेमुळे धरणातील साठा वाढला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७६ टक्के भरले आहे. गौतमी, कश्‍यपी, आळंदी धरणांत अद्याप साठा वाढण्याची अपेक्षा आहे. गंगापूर धरण भरले असले तरी त्यावरील धरणे मात्र अद्याप पूर्णपणे भरलेली नाहीत. त्यामुळे गंगापूर समूहात सायंकाळपर्यंत तरी विसर्ग सुरू झालेला नाही. दारणा धरणसमूहात मात्र समाधानकारक स्थिती आहे. भावली शंभर टक्के भरले आहे. दारणा८६ टक्के भरले आहे. त्यामुळे तेथून विसर्ग सुरू झाला आहे. मुकणे धरणात सध्या ३८ टक्केच साठा आहे. प्रमुख धरणातील पाणीस्थिती समाधानकारक असल्याने विसर्ग सुरू झाला आहे. 

इगतपुरीत १२६ मिलिमीटर पाऊस
इगतपुरी - तालुक्‍याच्या पश्‍चिम घाटपट्ट्यासह २४ तासांत १२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दाट धुक्‍यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक रविवारी (ता. २८) मंदावली. घोटी शहरात ६५ मिलिमीटर, तर धरण परिक्षेत्रात १२३ मिलिमीटर पाऊस, तसेच इगतपुरी शहरात १२६ मिलिमीटर, दारणा धरणाच्या परिक्षेत्रात व परिसरात ११८  मिलिमीटर, भावली धरण परिसरातही विक्रमी १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. संततधारेमुळे भात लागवडीला वेग आला असून, रविवारी अखेर तालुक्‍यात ५८ टक्के भात लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

जायकवाडीत २७ हजार क्‍युसेकने आवक
पैठण - नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरीत मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या जायकवाडी धरणात रविवारी (ता. २८) पाणी दाखल झाले. धरणात २७ हजार क्‍युसेक पाण्याची आवक सुरू आहे, अशी माहिती धरण सहायक अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी दिली. 

धरण नियंत्रण कक्षातील यंत्रणेने धरण पाणीपातळीची सायंकाळी पाच वाजता पहिली नोंद घेतली. त्यानुसार धरणाची पातळी १४८९.२० फूट (४५३.९०८ मीटर) व एकूण पाणीसाठा ५२८.०८ दशलक्ष घनमीटर, तर जिवंत पाणीसाठा २१०.१६ दशलक्ष घनमीटर होता. तसेच धरणाची टक्केवारी उणे ९.३७ टक्के होती. यावेळी १८ हजार ४७७ क्‍युसेक पाण्याची आवक होती. त्यानंतर पाणी येण्याचे प्रमाण वाढले. पुन्हा रात्री सात वाजता पातळीची नोंद घेण्यात आली. त्यावेळी पाण्याची आवक वाढली. त्यातील वाढीच्या नोंदीनुसार २७ हजार क्‍युसेकने वाढल्याचे दिसले. 

रात्रीतून लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, वाढत्या पाणीस्थितीबाबत तहसीलदार महेश सावंत, कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे हे विशेष नियंत्रण ठेवून आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Release in Nandur Madhmeshwar Dam Rain