डिझेलअभावी पाण्याचे टॅंकर बंद

विजयसिंह गिरासे : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

चिमठाणे - शिंदखेडा तालुक्‍यातील सहा गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र डिझेल नसल्याने गेल्या पाच-सहा दिवसांपासून टॅंकरने पाणी पुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यात दूषित पाण्यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

चिमठाणे - शिंदखेडा तालुक्‍यातील सहा गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र डिझेल नसल्याने गेल्या पाच-सहा दिवसांपासून टॅंकरने पाणी पुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यात दूषित पाण्यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

शिंदखेडा तालुक्‍यातील पाच टॅंकरना दोंडाईचा व नरडाणा येथील पेट्रोलपंपमधून डिझेल पुरवठा करण्यात येत होता; परंतु पेट्रोलपंप मालकांचे सुमारे सतरा लाख रुपये थकल्याने डिझेल पुरवठा थांबविण्यात आला आहे. तालुक्‍यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. तापी काठावरील गावे वगळले, तर पावसाळ्यात उर्वरित गावांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून, 44 गावांना 50 विहिरी, कूपनलिका अधिग्रहण केल्या आहेत.

डिझेल नसल्याने टॅंकर बंद
वारूड येथे 10 एप्रिल 2015 पासून, पथारे 8 एप्रिल2016 पासून, भडणे 19 ऑगस्ट 2016 पासून, दत्ताणे 6 ऑक्‍टोबर2016, अंजदे खुर्द 2 जानेवारी 2017 पासून व मेलाणे 2 जानेवारी 2017 पासून टॅंकर सुरू होते. मात्र पेट्रोलपंपमालकांची थकबाकी सतरा लाख रुपये झाल्याने डिझेल पुरवठा बंद केला. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी महिला, पुरुषांना शेतीचे कामे सोडून आणि विद्यार्थ्यांना शाळा सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आता नवीन निशाणे, तामथरे व चांदगड येथेही टॅंकरसाठी प्रस्ताव पाठविला आहे.

अधिग्रहणाचा वर्षानंतर मोबदला
शिंदखेडा तालुक्‍यातील 44 गावांना 50 विहिरी, कूपनलिका अधिग्रहण केल्या होत्या. तीन वर्षांपासून शेतकरी खरीप व रब्बी पिके सोडून गावाला पाणी पुरवठा करतात. शासनाने नोव्हेंबर 2015 पासून अधिग्रहण केलेल्या विहिरी, कूपनलिका मालकांना मोबदला दिला नाही. गेल्या जानेवारीत सुमारे 37 लाख रुपये निधी आला. नोव्हेंबर 2015 ते जून 2016 पर्यंत अधिग्रहण केलेल्या विहिरी,कूपनलिकाधारकांना मोबदला देण्यात आला आहे.

डिझेलसाठी शासनाकडूनच निधी उपलब्ध न झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेले टॅंकर बंद आहेत. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, अप्पर जिल्हाधिकारी हुलहुले व शिरपूर उपविभागीय अधिकारी नितीन गावंडे यांनाही याबाबत माहिती दिली आहे.
- गायत्री सैंदाणे, तहसीलदार, शिंदखेडा

Web Title: water scarcity in shindkheda