असोद्यात दहा दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

जळगाव - शेळगाव येथून होणाऱ्या सामूहिक पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल न भरल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे असोदा गावात गेल्या दहा दिवसांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून, गावाकरीता काही व्यवस्था करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांच्यावतीने आज जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

शहरापासून जवळ असलेल्या असोदा गावात दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळ पडत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. याचा परिणाम विविध संस्थांच्या वसुलीवर झाला आहे. पीक कर्जासह ग्रामपंचायतीचा कर देखील मोठ्या प्रमाणावर थकीत आहे. ग्रामपंचायतीकडून कर भरणा देखील होत नाही. त्यानुसार पाणी पुरवठा योजनेसाठीच्या वीज बिलाची रक्‍कम देखील थकलेली आहे.

महावितरणकडून कनेक्‍शन कट
महावितरणची थकीत बिलांची वसुली मोहीम सुरू असून, या मोहिमेतंर्गत वीज बिल थकबाकीमुळे सामूहिक पाणी पुरवठा योजना शेळगावचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे गेल्या दहा दिवसांपासून असोदा गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. 
ग्रामस्थांकडून निवेदन

वीज पुरवठा खंडित केल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्याच्या मागणीकरीता ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडेय यांना निवेदन दिले. निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीला एकाच वेळी बिलाची रक्‍कम भरणे शक्‍य नसल्याने तडजोड करून काही रक्‍कम कमी करून भरावी. तसेच जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून अत्यावश्‍यक पाणी पुरवठ्याच्या सोयीकरिता तरतूद करावी. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून टप्याटप्प्याने वीज बिलाकरीता तरतूद करून प्रश्‍न निकाली काढण्याची मागणी केली आहे. निवेदन देतेप्रसंगी तुषार महाजन, अनिल महाजन, किशोर चौधरी, बंडू भोळे, संजय महाजन, संजय ढाके आदी उपस्थित होते.

Web Title: water shortage in asoda