शहरात जुलैअखेर पुरेल इतका पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

यंदा मॉन्सूनचे आगमन पंधरा दिवस लांबणीवर पडणार असले तरी शहरासाठी मात्र धरणांमध्ये मुबलक साठा आहे. शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणांतून पाणीपुरवठा होतो. ३१ जुलैपर्यंत पुरेल इतके आरक्षित पाणी धरणांमध्ये शिल्लक असल्याने तूर्त नाशिककरांना पाण्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. परंतु पाऊस आणखी लांबल्यास शहरात पाणीकपात होण्याची दाट शक्‍यता आहे.

नाशिक - यंदा मॉन्सूनचे आगमन पंधरा दिवस लांबणीवर पडणार असले तरी शहरासाठी मात्र धरणांमध्ये मुबलक साठा आहे. शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणांतून पाणीपुरवठा होतो. ३१ जुलैपर्यंत पुरेल इतके आरक्षित पाणी धरणांमध्ये शिल्लक असल्याने तूर्त नाशिककरांना पाण्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. परंतु पाऊस आणखी लांबल्यास शहरात पाणीकपात होण्याची दाट शक्‍यता आहे.

शहराला मुख्यत्वे गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होतो. त्याशिवाय दारणा धरणातील चेहेडी पंपिंग स्टेशन येथून नाशिक रोड भागासाठी पाणी उचलले जाते. नाशिक रोड येथील पाणी दुर्गंधीयुक्त असल्याने येथून पाणी उचलणे बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी गांधीनगर जलकुंभावरून नाशिक रोड भागात पाणीपुरवठा केला जात आहे. सातपूरकडे पाणी अधिक वळविल्याने सिडको भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने मुकणे धरणातून पाणी उचलण्यास सुरवात केली आहे. मुकणे धरणातून दररोज ४० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते.सद्यःस्थितीत शहरात पाणीटंचाई नसली तरी मॉन्सून लांबण्याची शक्‍यता आहे. सध्या केरळच्या किनारपट्टीवर मॉन्सूनचे आगमन झाले आहे. पुढे आठ दिवस केरळमध्ये व तेथून पुढे देशात मॉन्सूनचे वारे वाहू लागतील. त्यानंतरही पावसाचा प्रवास अडखळल्यास टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Storage Dam Monsoon Rain