न्याहळोदला पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

न्याहळोद - येथील पाणीटंचाई तीव्र झाली असून, सार्वजनिक विहिरीने तळ गाठल्याने पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर सरपंच सुभाष जाधव यांनी पांझरा नदीकाठावरील स्वत:च्या मालकीच्या विहिरीचे पाणी गावासाठी उपलब्ध करून दिले आहे. दरम्यान, अक्‍कलपाडा धरणातील पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील गावांनी 
केली आहे.

न्याहळोद - येथील पाणीटंचाई तीव्र झाली असून, सार्वजनिक विहिरीने तळ गाठल्याने पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर सरपंच सुभाष जाधव यांनी पांझरा नदीकाठावरील स्वत:च्या मालकीच्या विहिरीचे पाणी गावासाठी उपलब्ध करून दिले आहे. दरम्यान, अक्‍कलपाडा धरणातील पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील गावांनी 
केली आहे.

संकटसमयी सरपंचांचे दातृत्व
येथील ग्रामस्थांना जानेवारीपासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक विहिरीने तळ गाठल्याने मार्चपासून पाच दिवसांनंतर पाणी पुरवठा केला जात आहे. अशा परिस्थितीत पाणीटंचाईवर मात कशी करायची? असा प्रश्‍न ग्रामपंचायतीसमोर उभा होता. सरपंच जाधव यांची पांझरा नदीपात्रालगत विहीर आहे. 

जिल्हा प्रशासनाकडून होणाऱ्या संभाव्य उपाययोजनांची वाट न पाहता सरपंच जाधव यांनी स्वत:च्या विहिरीचे पाणी गावविहिरीत सोडून गावाची 
तहान भागवत आहे. त्यातून ग्रामस्थांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

संकटसमयी पाणी उपलब्ध करून देण्याची परंपरा माजी सरपंच डॉ. भरत रोकडे यांच्यानंतर सरपंच सुभाष जाधव यांनी कायम ठेवली. 

अक्कलपाड्यातून पाणी सोडा
न्याहळोदसह परिसरास पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाच ते सहा दिवसांनंतर केवळ अर्धा पाऊणतास पाणी मिळते. जनावरांसाठी पाण्याचा प्रश्‍नही तीव्र आहे. 

पांझरा काठावरील विहिरींनी कधीचा तळ गाठला आहे. दिवसेंदिवस तो आणखीनच खालावत आहे. आगामी एप्रिल, मेमध्ये पिण्यासाठी पाणी कुठून आणायचे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून जिल्हा प्रशासनाने अक्‍कलपाडा धरणातील आरक्षित पाणी सोडावे. त्यामुळे न्याहळोदसह परिसरातील गावांची पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होईल.

‘पांझरे’तून अवैध वाळू उपसा थांबवा
येथील पांझरा नदीच्या पात्रातील अवैध वाळू उपसा त्वरित बंद करण्यासाठी महसूल व जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे. अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. नदीपात्रातील वाळू कमी झाल्याने जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता नष्ट झाली आहे. पावसाळ्यात पाणी  नदीपात्रात जिरत नसल्याने आज पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील सत्ताधारी व विरोधी गटाने वाळूप्रश्‍नाबाबत हेवेदावे विसरून गावाच्या हितासाठी सामूहिक भूमिका घ्यावी, अन्यथा नदीपात्रात वाळूऐवजी झाडे-झुडपे उगवलेली दिसतील. त्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करण्याची गरज आहे.

Web Title: water supply after five days to nyahdol