येवल्यात सलग आठ महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा सुरु   

येवल्यात सलग आठ महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा सुरु   

येवला - दिवाळी संपली की टँकरच्या पाण्यावर तहान भागविणारा हा तालुका..वर्षानुवर्षे याच तात्पुरत्या उपाययोजनेवर समाधानी राहात आहे. यामुळेच पाण्यासारखा कोट्यवधींचा चुराडा करूनही पुन्हा एकदा टँकरची आठवण दरवर्षी येत आहे. सध्या तर मार्च पासून म्हणजे आठ महिने झाले तेव्हापासून तालुक्यात टँकरने तहान भागविणे सुरू आहे.

टंचाईग्रस्त गावांसाठी कायमचे पर्याय शोधण्यात अपयश येत गेल्याने तालुक्यातील पन्नासवर गावे व ३५ वर वस्त्या आजही टंचाईच्या शापाच्या साडेसातीत आहेत. याचमुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा हा थातुरमातुर पर्याय राबविला जात आहे. दहा वर्षात सुमारे सात कोटी रुपये निव्वळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी झाला आहे.२००१ पासून विचार केल्यास तालुक्यात नीव्वळ टँकरवर सुमारे दहा ते बारा कोटी पर्यतचा चुराडा झाला आहे. अवर्षणप्रवण असलेला हा तालुका बिटीश सत्तेपासून दुष्काळी बिरूद घेऊन मिरवतो आहे, इंग्रजांनी येथे ना धरण केले ना कालवे..यामुळे आजही पाणी पाणी करण्याची नामुष्की ओढावत आहे.

टँकरसोबतच तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना, विशेष दुरुस्ती, विहीर खोल व गाळ काढणे, विंधन विहीर घेणे खासगी विहीर अधिग्रहण असे चिरगुटछाप मलमपट्टीचे अनेक पर्याय वर्षानुवर्षे प्रशासन राबवत आहे.मात्र एक ना धड भाराभार चिंद्या अशी अवस्था या छोट्या पर्यायांची झाल्याने अखेर टॅंकरने पाणीपुरवठा हाच अंतिम पर्याय ठरत आहेत. ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेने २००९ पासून ३८ व नंतर काही गावे जोडल्याने आजपर्यत ५५ वर गावे टँकरमुक्त झाली आहे. मात्र यासारखा दमदार पर्याय पुन्हा शोधला न गेल्याने डिसेम्बर नंतर ते मे या कालावधीत ७० च्यावर गावे टंचाईच्या खाईत लोटली जाऊन यांना टँकरने पाणी हाच पर्याय उपयोगात येत आहे. या थातूरमातूर पर्यायावर दिवस काढण्यापेक्षा आता नव्याने प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवण्याची वेळ आली आहे.

“अवर्षणप्रवण असलेल्या उत्तर पूर्व भागातील डोंगराळी गावात टंचाईची दाहकता अधिक असून या भागात योजना झाली तर तालुका टँकरमुक्त होऊ शकेल.या हेतूने माणिकपुंज धरणातून टंचाईग्रस्त गावांसाठी पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे.या योजनेला चालना देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न होऊन मंजुरी व निधी मिळवण्याची गरज आहे.”
-प्रवीण गायकवाड,सदस्य,पंचायत समिती

टँकरने पाणीपुरवठयावरील खर्च..
२००७-०८ - २ लाख १३
२००८-०९ - २६ लाख ६०
२००९-१० - २० लाख ७९
२०१०-११ - २ लाख ६
२०११-१२ - ४ लाख ९४
२०१२-१३ - ५१ लाख ४१
२०१३-१४ - ७३ लाख १५
२०१४-१५ - ६२ लाख ४९
२०१५-१६ - १ कोटी ७ लाख
२०१६-१७ - १ कोटी ८३ लाख
२०१७-१८ - सुमारे १ कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com