
Dhule Water Cut : तापी योजनेवरून शनिवारी पाणीपुरवठा बंद
Dhule News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी योजनेवरील बाभळे जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढण्यासह मुख्य जलवाहिनीला सहा ठिकाणी लागलेल्या गळत्यांची दुरुस्ती शनिवारी (ता. २०) करण्यात येणार आहे. (water will not supply on 20 may in dhule news)
या कामामुळे शनिवारी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असून, परिणामी त्या-त्या भागात एक दिवस उशिरा पाणीपुरवठा होणार आहे.
तापी पाणीपुरवठा योजनेद्वारे तापी नदीतून पाणी उचलले जाते. या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणावर गाळही येतो. हा गाळ जलशुद्धीकरण केंद्रात साचत राहतो. परिणामी तांत्रिक अडचणी निर्माण होतात. धुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी ही मुख्य योजना असल्याने ही योजना २४ तास सुरू असते.
ही योजना काही वेळ जरी बंद पडली तरी संपूर्ण धुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होतो. त्यामुळे मोठ्या दुरुस्तीची कामे व जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढण्याचे काम वर्षातून एक-दोन वेळा हाती घेतले जाते. याशिवाय अचानक काही समस्या उद्भवल्यास दुरुस्ती आवश्यक ठरते. शनिवारी (ता. २०) वीज कंपनीकडून शटडाउन घेण्यात येणार आहे. त्यामुळे हेच निमित्त साधून महापालिकेकडून तापी योजनेवरील दुरुस्तीची कामेही हाती घेण्यात आली आहेत.
सहा ठिकाणी लिकेज
बाभळे जलशुद्धीकरण केंद्राच्या क्लॅरीफॅक्युलेटरमधील गाळ काढणे, साफसफाई करणे, ब्रिज दुरुस्त करणे यासह मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळत्यांची दुरुस्तीही करण्यात येणार आहे. मुख्य जलवाहिनीला नरडाणा गावाबाहेर, नगाव पेट्रोलपंपाजवळ, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, बाभळे पंपिंग आवार, सुकवद पंपहाउस, देवभाने, सौजस डेअरीजवळ आदी ठिकाणी लिकेज दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच वर्षी गावाजवळील श्री. बोरसे यांच्या शेताजवळ जलवाहिनी जॉइंट दुरुस्तीचे कामही करण्यात येईल.
एक दिवस उशिराने पाणी
दुरुस्तीच्या कामामुळे शनिवारी (ता. २०) सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत योजनेवरील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण देवपूर भाग, बडगुजर जलकुंभ, मायक्रो टॉवर, दसेरा मैदान, चक्करबर्डी, मोहाडी, नाटेश्वर, जामचामळा या जलकुंभांवरून होणारा पाणीपुरवठा नियोजित वेळापत्रकापेक्षा एक दिवस उशिराने होईल. संबंधित भागातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले.