
Well Construction News : विहीर बांधकाम जिकिरीचेच काम; धुळे जिल्ह्यात राजस्थानी कारागीर दाखल
Dhule News : धुळे जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी विहिरींचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी लगीनघाई सुरू आहे. जिल्ह्यात सुमारे शंभरावर विहिरींचे बांधकाम सुरू आहे. विहीर बांधकामासाठी राजस्थानी कारागीर दाखल झाले आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून स्थानिकपेक्षा राजस्थानी कारागिरांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. पावसाळा अवघा दहा दिवसांवर आला आहे. विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांची लगबग सुरू आहे. (Well construction chore Rajasthani artisans entered in Dhule district Dhule News)
गेल्या तीन वर्षांपासून पाऊस सातत्यपूर्ण होत आहे. अवकाळी पावसाचाही तडाखा बसत आहे. विहिरी व कूपनलिकांचीही पाणीपातळी वाढली आहे. शासनाच्या अनुदानाच्या विहिरींचे प्रमाण वाढले आहे. अनुदान हे खोदण्यासह बांधकाम करण्यासाठी तीन लाखांवर गेले आहे. दर वर्षी विहिरींची संख्या वाढतीच आहे. परिणामी विहिरी खोदण्यासाठी व बांधणाऱ्या मजुरांना मागणी वाढली आहे.
खोदण्यासह बांधण्यासाठीही राजस्थानी
लग्नसराईसाठी राजस्थानी आचाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. त्या आचाऱ्यांना मोठी मागणी असते. किंबहुना त्यांच्याशिवाय स्वयंपाकाची चवच पूर्णत्वास येत नाही, असे म्हणणाऱ्यांचीही कमी नाही अन् आता विहीर खोदण्यासह बांधण्यासाठी राजस्थानीच मजूर हवेत, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.
राजस्थानी खोदकाम करणारे कारागीर विहिरी पूर्ण झाल्यानंतरच शेतातून बाहेर पडतात. तोपर्यंत त्यांचा शेतावरच डेरा दाखल असतो. त्याप्रमाणेच विहीर बांधकाम कारागिरांची स्थिती आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आठ दिवसांत विहिरी पूर्णत्वास
आता पोकलँडने विहिरी खोदण्याचे काम सुरू झाले आहे. साठ फूट खोल विहीर खोदण्यासाठी महिना लागतो. मात्र मोठे पोकलँड दाखल झाले आहेत. त्यांच्या सहाय्याने केवळ आठ दिवसांतही विहिरी खोदल्या जात आहेत. बरेचसे शेतकरी पोकलँडलाही प्राधान्य देत आहेत. काही राजस्थानी कंत्राटदारच पोकलँडच्या सहाय्याने विहिरी खोदू लागले आहेत.
"धुळे जिल्ह्यात दिवाळीनंतर विहीर बांधकामासाठी दाखल होतो. मोठ्या प्रमाणात विहिरी खोदणे व बांधकाम सुरू आहे. कूपनलिकेपेक्षा विहीर केव्हाही फायद्याचीच असते. विहिरीला पाणी लागले नाही तर आडवे बोर करता येते. पण कूपनलिकेला पाणी लागले नाही तर मोठा खर्च वाया जात असतो. विहीर बांधकाम करण्यासाठी विशेष कारागीर आवश्यक असतात."
-गोपाल भाई, राजस्थानी विहीर बांधकाम कंत्राटदार