जिल्हा बॅंकांतील नोटांचे करायचे काय? 

संपत देवगिरे - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नाशिक - केंद्र सरकारने पाचशे व हजारांच्या नोटांवर बंदी घातल्यावर पहिल्या चार दिवसांत राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती बॅंकांचे खातेदार, शेतकरी व सहकारी संस्थांकडून नऊ हजार कोटी रुपये जमा झाले. त्यानंतर या बॅंकांना अचानक नोटा स्वीकारण्यास प्रतिबंध करण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकरी तसेच रब्बीचा हंगाम संकटात सापडला आहे. विशेष म्हणजे या बॅंकांतील नऊ हजार कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचे काय करायचे, हा गंभीर पेच उभा राहिला आहे. 

राज्यातील 31 सहकारी बॅंकांतील नऊ हजार कोटींच्या नोटांचा प्रश्‍न आहे. याबाबत मुंबईच्या बॅंकेने न्यायालयात धाव घेतली. त्याची सुनावणी 19 नोव्हेंबरला आहे. न्यायालयीन प्रक्रियेत कालापव्यय होऊन नवीन पेच निर्माण होऊ शकतो. या बॅंकांचे संचालकही "भाजप'च्या आक्रमक प्रचारामुळे शांत आहेत. त्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. स्टेट बॅंकेने या नोटा स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समित्यातून मिळालेले शेतमालाचे व अन्य पैसे जमा करता येत नाहीत, काढता येत नाही व कर्जफेडही करता येत नाही. या पेचाविषयी सरकार तसेच स्टेट बॅंकेने मौन बाळगल्याने ग्रामीण भागात संतापाची स्थिती आहे. 

नाशिकमध्ये सर्वांधिक 44 नागरी सहकारी बॅंका, तेरा बाजार समित्या, एक हजार 26 विविध कार्यकारी सहकारी संस्था असून, त्यांचे खाते जिल्हा बॅंकेत आहेत. या बॅंकेच्या 226 शाखा असून, नोटांवरील बंदीच्या निर्णयानंतर पहिल्या चार दिवसांत त्यांच्याकडे 275 कोटी रुपये जमा झाले. याशिवाय नागरी सहकारी बॅंकांकडे 803 कोटींच्या नोटा आहेत. या एक हजार 78 कोटींच्या नोटा स्टेट बॅंकेच्या प्रादेशिक शाखाने स्वीकारणे थांबविले आहे. या बॅंकांकडे नोटा ठेवण्यास जागा नाही. नागरी बॅंकांना रोज पंधरा ते सोळा लाख रुपये दिले जातात. मात्र, खूप कमी नोटांचा भरणा स्वीकारला जातो. नोटांचा विमा मर्यादित असून, त्यापेक्षा रक्कम कितीतरी जास्त आहे. त्यामुळे बॅंकांना सुरक्षिततेचीही काळजी वाटत आहे. 

मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा 

या निर्णयानंतर सोशल मीडिया तसेच भाजप सरकारच्या पाठीराख्यांकडून स्वागताच्या प्रतिक्रियांचा महापूर लोटला. त्यात शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी, रब्बी हंगाम यांचा गंधही नसलेल्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात जिल्हा बॅंकांतील सर्व पैसे राजकीय नेत्यांचे आहेत, असे चित्र रंगवले गेले. सर्वच नेते बॅंका अडचणीत असताना असहाय्य आहेत. जिल्हा बॅंकांच्या कामगार संघटना पुढे आल्या आहेत. नाशिक दौऱ्यावर आज येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात हस्तक्षेप करावा, असे निवेदन नाशिकच्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रतन जाधव यांनी दिले. 

Web Title: What to do with the district bank notes