महापालिकेत सर्वच सत्ताधारी, विरोधक आहेत कुठे?

महापालिकेत सर्वच सत्ताधारी, विरोधक आहेत कुठे?

जळगाव - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामाची रचना करताना सत्तेवर असलेला पक्ष चुकीच्या मार्गाने जात असल्यास त्याला आळा घालण्यासाठी विरोधी पक्षांना तेवढेच अधिकार आहेत. जळगाव महापालिकेत चित्र काहीसे वेगळे दिसते. येथे सर्वच सत्ताधारी आहेत, तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे हे विरोधक असूनही ते महापालिकेतून गायब झाले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या सुरात विरोधक सूर मिळवू लागल्याने विरोधी पदच रद्द करावे का? असे आता जळगावकरांना वाटू लागले आहे. 

महापालिकेच्या कारभारामुळे नागरिक अर्थाने त्रस्त आहेत; परंतु बोलणार कुणाला, असा प्रश्‍न आहे. ‘तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार’ अशी स्थिती खरोखरच जळगावकरांची झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यंाबद्दल बोलायचे नाही, फुटणाऱ्या जलवाहिनीचा ‘ब्र’ काढायचा नाही, पथदिव्यांअभावी अंधार असला, तर तो सहन करायचा, या समस्यांविरुद्ध बोलणार कोण?

महापालिकेत आजच्या स्थितीत सर्वच सत्ताधारी आहेत. कारण, विरोधक नावालाच आहेत. ते कोणत्याच गोष्टीला विरोध करीत नाहीत.  प्रत्यक्षात ते सत्ताधाऱ्यांच्या गोटात मिसळल्याचे चित्र आहे. निवडणुकीत मतदान घेताना ते विरोधक असतात. एकदा निवडून आल्यानंतर मात्र सर्वांनाच सत्तेची ‘हाव’ असल्याचे दिसून येत आहे. 

विरोधकांचा सूर मवाळ
महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे विरोधक आहेत; परंतु सद्यःस्थितीत मनसेने खानदेश विकास आघाडीला पाठिंबा दिल्याने ते सत्तेत भागीदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत सत्तेत आहे की विरोधात आहे, हे पक्ष नेतृत्वालाही माहित नाही. कारण त्यांच्यात नगरसेवक तेवढे गट असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या आदेशानुसार त्यांचे मतदान होत असते. असे त्यांच्यांच गोटातून सांगितले जाते. महापालिकेत भाजप हा महत्वाचा विरोधी पक्ष मानला जातो, त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदही आहे. त्यामुळे त्यांचे मोठे कर्तव्य ठरत आहे. परंतु आजच्या स्थितीत त्यांचाही फारसा कडवा विरोध असल्याचे दिसत नाही, महापालिकेतील भाजपतही फारसे अालबेल नसल्याचे त्यांचे सदस्य सांगतात. त्यांच्यातील एक गट सत्ताधाऱ्यांसोबत असल्याचे सांगितले जात आहे. मोजके सदस्य विरोध करण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांचा आवाजही क्षीण केला जात असल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवणार कोण? हाच खरा प्रश्‍न आहे. 

अनेक प्रश्‍न अन्‌् सर्वत्र शांतता महापालिकेतील कर्जाचा प्रश्‍न सुटलेला नाही, गाळ्यांचा भाडे प्रश्‍नाचा तिढा आहे, खड्डे बुजविण्याबाबत ठोस भूमिका नाही. एवढेच कमी की काय म्हणून आता ‘अमृत’चा घोळ घालण्यांत आला आहे.

देशात व राज्यात सत्तेवर असलेला भाजप महापालिकेत विरोधी आहे. त्यांना जनतेच्या प्रश्‍नांवर आवाज उठविता येऊ शकतो. छोट्या- छोट्या बाबींवर आंदोलन करणारा भाजप मात्र आज महापालिकेतील सर्वच परिस्थितीवर मूग गिळून गप्प आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मत मागणारे भाजपा सदस्य जर निवडून गेल्यावर जनतेसाठी आवाज उठवीत नसतील, तर हा जनतेचा विश्‍वाघातच आहे. त्यामुळे आगामी काळात जनता विश्‍वास ठेवणार कसा? हाच प्रश्‍न आहे. त्यामुळे कारभारी म्हणून निवडून दिलेले विरोधक विकासासाठी आवाज उठविणार नसतील तर तेही जनतेचे कैवारी आहेत की वैरी हे त्यांनीच ठरवावे. मात्र वर्षभराने निवडणूका येत आहे, पुन्हा जनतेच्या समोर जावेच लागणार आहे. अर्थात वर्षानुवर्षे नरेंद्र भास्कर पाटील यांची महानगर विकास आघाडी एकमेव विरोधक आहे, हे मात्र निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com