सोलापूर : संम्मती परिसरात अक्षतांचा वर्षाव करताना भाविक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

सत्यम सत्यम.. उच्चारताच चारही बाजूंनी झाला अक्षतांचा वर्षाव

सत्यम सत्यम.. उच्चारताच चारही बाजूंनी झाला अक्षतांचा वर्षाव

सोलापूर : रंगीबेरंगी फुलांनी मांडवासारखा सजलेला संम्मतीकट्टा.., तालात वाजणारा सनई चौघडा.., ना पत्रिका.. ना कोणाचं बोलावणं.. तरीही उत्साहाने जमलेली लाखोंची गर्दी.., सर्वांच्याच मुखात ओम सिद्धरामाय नम:शिवाय..चा जाप.., पांढऱ्या शुभ्र बाराबंदीतल्या मानकऱ्यांची लगबग.., एकदा भक्तलिंग हर्र.. बोला हर्र.., शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज की जय..चा जयघोष.., दुपारी सव्वा दोनची वेळ.., सत्यम सत्यम.. दिड्डम.. दिड्डमचा उच्चार आणि चारही बाजूंनी पडलेल्या अक्षता.. हे चित्र आहे ग्रामदैवत सिद्धेश्‍वर महाराजांच्या योगदंडाचा कुंभारकन्येशी शुक्रवारी लागलेल्या सोहळ्याचे. 

नंदीध्वजाच्या मार्गाकडे डोळे लावून बसलेल्या भाविकांचे चेहरे दुपारी दीडच्या सुमारास आनंदाने खुलले. पंचरंगी ध्वजासह सातही मानाच्या नंदीध्वजाचे आगमन झाल्यानंतर डोळे मिटून हात जोडून प्रत्येकांनी नमन केले. पारंपरिक वाद्यासह नाशिक ढोलच्या दणदणाटाने वातावरणात अधिकच उत्साह संचारला होता. पांढऱ्या शुभ्र बाराबंदीतल्या भाविकांची लाट संम्मती कट्ट्याच्या दिशेने आली. डौलाने संम्मती कट्ट्याकडे येणाऱ्या नंदीध्वजांना स्मार्ट फोनमधील कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उपस्थितांची धडपड सुरू होती. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांनी मुख्य मार्ग बंद केला होता. दोन वर्षाच्या चिमुकलीपासून ऐंशी वर्षाच्या आजोंबापर्यंत सगळ्यांच्या मुखात एकदा भक्तलिंग हर्र.. बोला हर्र.., शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज की जय.. च्या जषघोषांनी आसमंत दुमदुमून गेला होता. नंदीध्वजाच्या आगमनानंतर हिरेहब्बू सिद्धेश्‍वर महाराजांच्या पूजेसाठी मंदिरात गेले. सकाळपासूनच माईकचा ताबा घेतलेल्या बसवराज शास्त्रींनी कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषेतून खुमासदार शैलीत निवेदन करून सर्वांनाच खिळवून ठेवले होते. तोवर संमती कट्ट्यावर विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण झाली होती. पूजा करून परत आल्यानंतर हिरेहब्बूंनी यात्रेची थोडक्‍यात माहिती सांगितली. त्यानंतर संमती वाचन सुरू झाले. प्रत्येक कडव्याच्या शेवटी "सत्यम....सत्यम....' उच्चारताच अक्षतांसाठी लाखो भाविकांचे हात उंचावले. जवळपास दहा मिनिटे अक्षता सोहळ्याचा कार्यक्रम चालला. एकाच वेळी लाखो हातांनी पडणाऱ्या अक्षतांचा हा सोहळा जणू डोळे दिपवणारा ठरला. अक्षता सोहळ्यानंतर नाशिक ढोलच्या पथकाने पुन्हा ताल धरला. 

अक्षता सोहळ्याला महापौर प्रा. सुशीला आबुटे, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, सिद्धेश्‍वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची आवर्जून उपस्थित होते. 

 

Web Title: While devotees pour Akshata sammmati area in solapur