पांढऱ्या सोन्याने आणले शेतकऱ्यांना अडचणीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

कापडणे - आधीच दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांमागचे शुक्‍लकाष्ठ संपायला तयार नाही. उन्हाळी कांदा दराअभावी चाळीतच सडला. यामुळे शेतकऱ्यांना आपापल्या चाळीतील शेकडो क्विंटल कांदा अक्षरशः फेकून द्यावा लागला. यानंतर कपाशी लागवडीवर शेतकऱ्यांनी भर दिला. मात्र, पुरेशा पावसाअभावी त्याचेही उत्पादन घटले. जो कापूस पिकला तो विकून चार पैसे हाती येतील या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची नोटाबंदीमुळे जणू नाकाबंदीच झाली आहे. कापूस विक्रीनंतरही हाती पैसे नसल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

केंद्र सरकारने गेल्या आठ नोव्हेंबरला पाचशे व हजारांच्या चलनातून रद्द करून महिना झाला तरी ग्राहकांना पुरेसे पैसे मिळत नसल्याचे चित्र आहे. यात शेतकऱ्यांचीच मोठी अडचण होत आहे. यंदा पावसाअभावी कापसाचे उत्पादन घटले असले, तरी जो कापूस पिकला त्याची खेडा खरेदीतून व्यापारी खरेदी करत आहेत. व्यापारी खरेदी केलेला कापूस गुजरातमध्ये विकतात. नवीन नोटांच्या अडचणीमुळे कापसाचे पेमेंट रोखीने अदा केले जात नसल्याने कापूस विक्रीचे पैसे मिळण्यात अडचणी येत आहेत.

शेतकऱ्यांना द्यावा लागतो सातबारा
जिल्ह्यात बहुतांश कापसाची खेडा खरेदी केली जाते. यात व्यापारी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करतात. त्यासाठी कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांकडून त्यांच्या नावाचा सातबारा घेतला जात आहे. खेडा खरेदी करणारे व्यापारी गुजरातमधील व्यापाऱ्यांना कापूस विकल्यानंतर शेतकऱ्यांचे जमा केलेले सातबारे त्या व्यापाऱ्यांना देतात. नोटाबंदी व नवीन नोटा चलनात अजूनही पुरेशा प्रमाणात न आल्याने गुजरातमधील व्यापारी सातबाराप्रमाणे शेतकऱ्यांच्या नावाचे धनादेश देतात. खेडा खरेदी करणारे व्यापारी धनादेशांचे शेतकऱ्यांना वाटप करतात. 

बॅंकांमध्ये विविध अडचणी
गुजरातमधील व्यापारी कापसाच्या पेमेंटपोटी धनादेश देत आहेत. ज्यांना धनादेश नको असतील त्यांना या व्यापाऱ्यांकडून चलनातून हद्दपार झालेल्या पाचशे-हजारांच्या नोटा स्वीकारण्याचा आग्रह होतो. मात्र, या नोटा कुठे खपवायच्या, या भीतीने शेतकरी त्या नाकारतात व नाइलाजाने धनादेश स्वीकारतात. हे धनादेश  राष्ट्रीयीकृत बॅंकांत वटविण्यासाठी दिल्यास काही बॅंकांकडून कमिशन कापले जाते. त्यात शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. शेतकऱ्यांनी नागरी, सहकारी बॅंकांत धनादेश वटविण्यास दिल्यास परप्रांतातील धनादेश असल्याने ते या बॅंका स्वीकारत नाहीत. स्वीकारलेच तर ते वटविण्यास राष्ट्रीयीकृत बॅंकांपेक्षा अधिक कालावधी लागतो. यातच धनादेशांवरील नावांमध्ये चुका झाल्यास ते वटविण्यात अडचणी येतात. धनादेश देणाऱ्या व्यापाऱ्यांचे बॅंक खाते गुजरातमध्ये असल्याने हे धनादेश वटण्यासाठी तब्बल एक ते दीड महिना लागतो. यामुळे कापूस विकल्यानंतरही शेतकऱ्यांच्या हाती पैसे पडण्यास उशीर होत आहे.

कापसाची खरेदी थंडावली
अशा अनंत अडचणींमुळे सध्या जिल्ह्यात ७० टक्के व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी थांबविली आहे. यामुळे कापसाचे भावही स्थिर झाले आहेत. जे व्यापारी खरेदी करतात तेही धनादेशाद्वारे व्यवहार करीत आहेत. यात प्रामुख्याने शेतकरीच भरडला जात आहे.

Web Title: White gold, brought trouble to the farmers