सातपुड्याच्या जंगलात दुर्मीळ पांढरा मोर

आनंद बोरा
मंगळवार, 25 जून 2019

ग्रामीण कृषी कार्यानुभवअंतर्गत अभ्यास करताना पांढऱ्या मोरांचे दर्शन घडले. वन्यजीव संरक्षण संस्थेत काम करत असल्याने पक्षिमित्रांना त्याबद्दलची माहिती कळवली. या मोरांची छायाचित्रे पाठवली. परिसरात खूप मोर असून त्यांना संरक्षण मिळणे आवश्‍यक आहे.
- सागर निकुंभे, विद्यार्थी, शहादा

नाशिक - सातपुड्याच्या पाच व सहा पुडामधील हरणखुरी (ता. धडगाव) गावातील भाडोला डोंगर परिसरात निसर्गाचा अनोखा चमत्कार पाहायला मिळतोय. शिवारात दीड हजारांहून अधिक मोर असून त्यामध्ये पांढऱ्या मोरांची संख्या शंभरच्या आसपास असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

शहादा (जि. नंदुरबार) येथील कृषी महाविद्यालयातील ग्रामीण कृषी कार्यानुभवअंतर्गत अभ्यास करताना सागर निकुंभे या विद्यार्थ्याला पांढऱ्या रंगाचे मोर दिसले. त्याने ही बाब पक्षिमित्रांना सांगितली आणि छायाचित्रातून ही दुर्मीळ जात पुढे आली. गावकऱ्यांकडून गेल्या पाच वर्षांत वन विभागाच्या 65 हेक्‍टर जमिनीवर वनसंवर्धनाचे काम सुरू आहे. श्रमदानातून डोंगराच्या भागात झाडे लावली. त्यानंतर तितर आणि सशांबरोबर मोरांची संख्या वाढत गेली. जंगली कुत्री (कोळसुंदे), बिबट्या आणि तरस यांचा वावर वाढला. खाद्य उपलब्ध झाल्याने मोरांच्या संख्येत भर पडली, असे अर्जुन पवार यांनी सांगितले.

पांढऱ्या मोरांविषयी अधिक माहिती घेतल्यावर, देशात "अल्बिनो' म्हणजे पांढरा मोर आढळतो. तो पूर्ण पांढरा असतो. त्याचे डोळे लाल असतात; पण गावात जो पांढरा मोर आढळला, त्याचे पूर्ण शरीर पांढरे, मान निळी व डोळेही निळे आहेत. पांढऱ्या लांडोरीचा गळा विटकरी आहे. असे मोर कुठेही आढळून आले नसल्याचे काही पक्षिमित्रांचे म्हणणे आहे. "ब्रीडिंग'मधून या मोरांची उत्पत्ती झाल्याची शक्‍यता पक्षिमित्र उमेश नगरे यांनी वर्तवली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: White Peacock in Satpuda Forest