उपमहापौरपदाचे दावेदार कोण? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

स्थायी सभापतिपदासाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी, नाराजी ओढवण्यापेक्षा होणार समन्यायी वाटप 

नाशिक - नाशिक महापालिकेत बहुमत मिळाल्याने इतर पक्षांचा टेकू घेण्याचा मुद्दा भाजपसाठी निकाली निघाला आहे. आता एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आलेल्या नगरसेवकांची नाराजी ओढावली जाऊ नये, यासाठी पदांचे समान पद्धतीने वाटप करावे लागणार आहे. नवख्या नगरसेवकांना महिला व बालकल्याण समिती, शिक्षण समिती, वृक्ष प्राधिकरण समिती व प्रभाग समित्यांचे सभापतिपदावर विराजमान करण्याचे नियोजन आहे. सर्वाधिक स्पर्धा उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपदासाठी होणार आहे. यात शहरातील तिघाही आमदारांची कसोटी लागेल. 

गेल्या पाच वर्षांचा विचार करता स्थायी समितीचे पाच सभापती व उपमहापौरपदाचे दोन टर्म व अडीच वर्षांनंतर महापौरपदाचे आरक्षण कसे निघते, त्यावर एका पदाचा निर्णय अवलंबून राहील. त्यातही आरक्षण निघाले तर त्यावर प्रवर्गातील सदस्याला स्थान देता येईल. पण उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपदे हक्काची असल्याने ती पदे मिळविण्यासाठी भाजपमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. स्थानिकांकडून जी नावे वरिष्ठांकडे पाठवली जातील, तीच नावे निश्‍चित होतील. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांचे संघटनापातळीवर वर्चस्व निर्माण झाल्याने सध्या तरी ते जे सांगतील ती काळ्या दगडावरची रेघ समजली जात आहे. पण सानप यांचा वरचष्मा महापालिकेत निर्माण होऊ नये, यासाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांनीही समर्थक नगरसेवकांना अधिकाधिक पदे मिळवून देण्याची तयारी केली आहे. 

हेच प्रमुख दावेदार 
माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी पद मिळविण्यासाठी प्रमुख दावेदार ठरत असल्याने निवडणुकीतच त्यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, पण लाटेत श्री. कुलकर्णी यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. त्यानंतर संभाजी मोरुस्कर यांचे स्थान आहे. मोरुस्कर पूर्वी गटनेते राहिले आहेत. भाजपच्या विजयाची सुरवात शहरात दिनकर पाटील यांच्या विजयाने झाली आहे. त्यामुळे तेही उपमहापौर, स्थायी समिती सभापतिपदाच्या शर्यतीत राहतील. 

आमदार हिरे, फरांदे समर्थकांना स्थान? 
पंचवटीतील रंजना भानसी महापौरपदाच्या दावेदार असल्याने खालच्या पदावरून त्यांचे नाव आपोआप बाद होते. त्याव्यतिरिक्त उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपदाच्या शर्यतीत आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश, आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या भगिनी हिमगौरी आडके, आमदार फरांदेसमर्थक स्वाती भामरे यांचेही नाव महत्त्वाच्या पदांच्या शर्यतीत राहणार आहे. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले व विजयी झालेले उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे, तसेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले दिनकर आढाव, मनसेतून भाजपमध्ये आलेले शशिकांत जाधव व सतीश कुलकर्णी यांचाही महत्त्वाच्या पदांच्या शर्यतीत नाव आहे. 

...अन्यथा वाढेल खदखद 

आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र, माजी आमदार वसंत गिते यांचे पुत्र प्रथमेश यांना महत्त्वाची पदे मिळवून देण्यासाठी दोघांचे प्रयत्न राहतील. दोघांनाही एकाच वेळी महत्त्वाची पदे मिळाल्यास भाजपमध्ये अंतर्गत खदखद वाढण्याची चिन्हे आहेत. याशिवाय गितेसमर्थक नगरसेवकांनाही महत्त्वाची पदे मिळवून देत विधानसभेची दावेदारी भक्कम करण्याचा प्रयत्न श्री. गिते यांचा राहील. आमदार सानप यांच्याकडून पंचवटी विभागात अधिक विधानसभेची तयारी केली जाण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Who is Deputy Mayor candidate