वाइन विक्रीसाठी नव्या "चॅनल'वर भर

महेंद्र महाजन
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नाशिक - "वाइन कॅपिटल ऑफ इंडिया' म्हणून जगाच्या नकाशावर स्थान मिळवलेल्या नाशिकमधील वाइनच्या विक्रीसाठी आता उत्पादकांनी "ट्रॅव्हल रिटेल'च्या नव्या "चॅनल'वर भर दिलाय. देशातील 24 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळांपैकी अधिक प्रवाशांची वर्दळ राहणाऱ्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूर विमानतळांवरून करमुक्त वाइन विक्री व्यवस्थेला प्राधान्य देण्यात आले आहे.

महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे एक कोटी 35 लाख लिटर वाइनचे उत्पादन होते. त्यातील चाळीस टक्के वाइन राज्यात खपते. आठ टक्‍क्‍यांपर्यंत वाइनची निर्यात होते, तर उरलेली 52 टक्के वाइन दिल्ली, पंजाब, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान, केरळ, सिक्कीम, आसाम या राज्यांतून विकली जात आहे. केरळमध्ये दारूबंदी असली, तरीही तेथे वाइन विक्रीला मुभा आहे. देशांतर्गत वाइनची मागणी वाढत आहे. त्यातच वाइन द्राक्षांचा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर असलेली स्पर्धा, अशी कारणे ध्यानात घेऊन उत्पादकांनी देशांतर्गत वाइन विक्रीकडेदेखील लक्ष वळवले आहे.

15 देशांमध्ये वाइनची निर्यात
इंग्लंड, स्पेन, फ्रान्स, जपान, अमेरिका, रशिया अशा जवळपास पंधरा देशांमध्ये वाइनची निर्यात केली जाते. वाइन उत्पादनात आघाडीवर असलेल्या सुला विनियार्डस्‌तर्फे निर्यातीपेक्षा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून करमुक्त वाइनच्या विक्रीला विशेष पसंती दिल्याचे चित्र पुढे आले आहे. दोन वर्षांमध्ये जिल्ह्यातून साडेचार लाख लिटरच्या आसपास निर्यात झाली आहे. विमानतळावरून करमुक्त वाइन विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. सुलाने गेल्या वर्षी तीन विमानतळांवरून 74 हजार लिटर वाइनची विक्री केली होती. ती यंदा एक लाख लिटरच्या पुढे पोचली आहे.

Web Title: wine sailing new channel