मळगाव येथील दारू दुकानाला संतप्त रणरागिणींकडून आग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

सटाणा - गेल्या 10 ते 15 वर्षांपासून मद्यपींकडून सतत होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आज संतप्त रणरागिणींनी मळगाव (तिळवण) शिवारातील शासनमान्य दारू दुकानाला आग लावून विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली होती.

शहरानजीक आरम नदीपात्रालगत मळगावचे देशी दारू दुकान आहे. महामार्गालगतची मद्यविक्री बंद झाल्यापासून बागलाण तालुक्‍यातील तळीरामांची या दुकानात गर्दी होत आहे. अगदी सकाळपासून रात्री दहापर्यंत येथे रेशनिंगच्या रांगेप्रमाणे दारू खरेदीसाठी रांगा लागते. कुरापत काढून रोजच भांडणं होऊ लागल्याने मळगाव व आसपासच्या वस्त्यांवरील महिलांच्या संतापात अधिकच भर पडली. आज सकाळी परिसरातील शंभर ते दीडशे आदिवासी शेतमजूर महिलांनी ठरवून दुकानाला घेराव घातला. त्यांच्यासोबत आलेल्या शाळकरी मुलांनी शटर तोडून दुकानात प्रवेश करत दारूच्या बाटल्या, फ्रीज, पंखे आदी साहित्याची तोडफोड केली. काहींनी दुकानाच्या सभोवतालचे पत्रे तोडून फेकण्यास सुरवात केली. ही तोडफोड सुरू असतानाच दुकानातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दुकानाला आग लागली. महिलांनी दुकानासमोरील साहित्यही पेटवून दिले व दुकानाजवळील नदीपात्रात ठिय्या केला. सटाणा पोलिस ठाण्यात ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बशीर शेख तातडीने दुचाकीवर घटनास्थळी पोचले.

त्यांच्यासह पोलिस कर्मचारी येथे पोचेपर्यंत दुकान जळून खाले झाले होते.

Web Title: wine shop fire by women