मातेने दिला 108 रुग्णवाहिकेतच जुळ्यांना जन्म 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

नाशिक - पांढुर्ली (ता. सिन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून जिल्हा रुग्णालयात गर्भवतीला घेऊन निघालेल्या 108 रुग्णवाहिकेतच मातेने जुळ्यांना जन्म दिला. अर्थात, रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची समयसूचकता आणि चालकाची कसरत यामुळे गर्भवतीची प्रसूती रुग्णवाहिकेत सुखरूप झाली. त्यानंतर एक मुलगा व एक मुलीसह मातेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

नाशिक - पांढुर्ली (ता. सिन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून जिल्हा रुग्णालयात गर्भवतीला घेऊन निघालेल्या 108 रुग्णवाहिकेतच मातेने जुळ्यांना जन्म दिला. अर्थात, रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची समयसूचकता आणि चालकाची कसरत यामुळे गर्भवतीची प्रसूती रुग्णवाहिकेत सुखरूप झाली. त्यानंतर एक मुलगा व एक मुलीसह मातेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

मुक्ता तुकाराम मसाळ (35, रा. चंद्रपूर घोडेवारी, ता. सिन्नर) पांढुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल झाल्या. प्रसूतीपूर्व तपासणीत मुक्ता यांना जुळे होणार असल्याची कल्पना होती. आरोग्य केंद्रात त्यांची प्रसूती करणे काहीसे धोकादायक होते. त्यामुळे त्यांनी 108 रुग्णवाहिकेला कॉल केला. त्यानुसार 108 रुग्णवाहिका बुधवारी (ता. 19) सकाळी पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात पोचली. तेथून मुक्ता यांना घेऊन रुग्णवाहिका घोटी-सिन्नर, देवळालीमार्गे नाशिकच्या दिशेने निघाली. या वेळी रुग्णवाहिकेत वैद्यकीय अधिकारी कांचन चव्हाणही होत्या. त्यांनी 108 रुग्णवाहिकेचा चालक भीमराव जाधव यांना वाहन चालवितानाच्या महत्त्वाच्या सूचना दिला. पण मुक्ता यांना प्रसूतीच्या कळा जाणवू लागल्याने डॉ. चव्हाण यांनी रुग्णवाहिका विंचूर दळवी येथे थांबवली आणि 10 वाजून 47 मिनिटांनी मुक्ता यांनी मुलाला जन्म दिला. गर्भात जुळे असल्याने काही मिनिटे त्यांनी प्रतीक्षा केली. पण दुसऱ्या बाळाच्या जन्माची चिन्हे दिसत नसल्याने त्यांच्या सांगण्यावरून रुग्णवाहिका काहीशी संथ गतीने देवळालीच्या दिशेने निघाली. रुग्णवाहिका देवळाली कॅम्प परिसरात आली असतानाच 11 वाजून 5 मिनिटांनी मुक्ता यांनी मुलीला जन्म दिला. धावत्या रुग्णवाहिकेत प्रसूती होण्याची ही काही पहिलीच घटना नव्हती. पण जुळ्यांना जन्म दिल्याची मात्र नक्कीच होती. त्यातही काहीसा धोकाही होता. तरीही डॉ. कांचन चव्हाण यांनी धीराने ही परिस्थिती हाताळली. रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. मुलाचे वजन 1 किलो 675 ग्रॅम, तर मुलीचे वजन 1 किलो 580 ग्रॅम भरले. जुळ्यांसह मातेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ. कांचन चव्हाण आणि चालक जाधव यांचे 108 रुग्णवाहिकेचे नाशिक जिल्ह्याचे समन्वयक डॉ. अश्‍विन राघमवार व जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती विभागाने विशेष कौतुक केले. 

Web Title: woman gave birth to twins in 108 ambulances