मुलीला जन्म दिल्याने महिलेला काढले घराबाहेर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

नाशिक - मुलगा व मुलगी असा फरक राहिलेला नाही, पण वंशाला दिवाच हवा या अट्टहासापोटी मुलीला जन्म दिल्याच्या कारणावरून प्राध्यापकाने आपल्या पत्नीला घराबाहेर काढल्याची घटना उघडकीस आली. या संदर्भात संबंधित महिलेने अंबड पोलिस ठाण्यात पती व नातेवाइकांविरोधात फिर्याद दिली. हुंड्यासाठी सातत्याने छळ होत असल्याचे फिर्यादीत नमूद केले.

गेल्या शुक्रवारी अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. प्रियंका गोसावी (वय २७) यांच्या तक्रारीनुसार अंबड पोलिस ठाण्यात तिने पती, सासू, सासरे व दीर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. उंटवाडी येथील प्रियंकाचे लग्न नोव्हेंबर २०१५ मध्ये कामटवाडे परिसरातील कृष्णा गोसावी यांच्याशी झाले होते. जुलै २०१६ मध्ये प्रियंकाच्या सासू संगीता गोसावी यांनी तिच्या अंगावरील राणीहार, नेकलेस व कानातील दोन जोड, गोफ, दोन अंगठ्या, असे सोन्याचे दागिने काढून घेतले. नोव्हेंबर २०१६ मध्ये प्रियंकाला मुलगी झाली. पहिली मुलगीच झाल्याने सासरच्या मंडळींनी प्रियंकाला त्रास देण्यास सुरवात केली. त्रासामुळे तिचे मानसिक संतुलनही बिघडले. पती कृष्णा गोसावी, सासू-सासऱ्यांनी तिच्याशी बोलणे बंद केले. प्रियंकाने दागिने मागितले असता, ते देण्यास नकार देत प्रियंका व मुलगी कनिष्का यांना डिसेंबर २०१७ मध्ये घराबाहेर काढले. लग्नानंतरच्या मानसिक व शारीरिक त्रासाची तक्रारही तिने महिला सुरक्षा विशेष विभागाकडे दिली. महिला सुरक्षा विभागाने दिलेल्या पत्रानुसार प्रियंकाने अंबड पोलिस ठाण्यात छळाची फिर्याद दिली.

Web Title: woman removed at home for birth to the girl crime