निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याने गेला महिलेचा जीव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

संतप्त जमावाची भावना; जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनाची तोडफोड

संतप्त जमावाची भावना; जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनाची तोडफोड

जळगाव - गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयातील काही झाडे कोरडीठाक, तर काहींच्या फांद्या जीर्ण झाल्याने त्या केव्हाही पडण्याचा धोका होता. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय प्रशासनासह महापालिकेलाही निवेदन दिले. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नाही. शेवटी आज या कोरडेठाक झाडाच्या फांदीनेच संगीता प्रवीण सोनवणे (वय ३२) या निष्पाप महिलेचा जीव घेतला, तर सिंधूबाई भास्कर पाटील (वय ७०, रा. पाचोरा) व सकिना चाँदखाँ तडवी (वय ४०) यांना जखमी केल्याने जमाव संतप्त झाला. त्यातूनच जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनाची तोडफोड होऊन दालन होत्याचे नव्हते झाले.

दरम्यान, कार्यकर्ते व नागरिकांच्या निवेदनावर वेळीच कार्यवाही केली असती, तर अशा प्रकारची दुर्घटना टळली असती, असे आता बोलले जात आहे. आज सकाळच्या घटनेमुळे संपूर्ण रुग्णालय परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील जनकल्याण समितीच्या सेवालयातर्फे भोजन वाटपाचे काम सुरू असताना सेवालयालगतच्या झाडाची मोठी फांदी पडून सेवालयात सेवा देणाऱ्या संगीता सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्याच्या घटनेनंतर रुग्णालयातील एकूणच व्यवस्थेसंदर्भात प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

जमावाच्या संतापाचा उद्रेक
मृत संगीता सोनवणे जवळच तुकारामवाडीतील रहिवासी असल्याने घटनेचे वृत्त कळताच परिसरातील रहिवासी नागरिक व तरुणांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सेवालयाबाहेरील कोरडेठाक झाड घातक असल्याने भाजप कार्यकर्ता विशाल शंकर चौधरी यांच्यासह नागरिकांनी दोनवेळेस निवेदन दिले, मात्र तरीही कार्यवाही झाली नाही. दुर्घटना घडल्यावर महापालिका कर्मचारी घटनास्थळी धडकले. जीव गेल्यावर तुम्हाला जाग आली का? असे म्हणत संतप्त नातेवाइकांनी त्यांच्या अंगावर कुऱ्हाड उगारत पिटाळून लावले.

रुग्ण उपाशी, नातेवाइक जखमी
रुग्णासोबतच्या नातेवाइकांनी जेवणासाठी रांग लावली असताना दुर्घटना घडली. जखमी सिंधूबाई पाटील यांचा मुलगा रवींद्र पाटील उपचारार्थ दाखल आहे, तर सकिना तडवी यांची सून महिला कक्षात दाखल आहे. जेवणाचे कुपन घेऊन रांगेत उभ्या असताना फांदी पडून दोन्ही जखमी झाल्या व रांगेतील इतर जेवण न घेताच निघून गेले. परिणामी, जखमींचे रुग्ण व इतरांना उपाशी राहावे लागले. 

मेनूसह होता वाढदिवसाचा चिवडा
जनकल्याण समितीत कार्यरत संगीता सोनवणे यांची मुलगी चिन्मयीचा आज सातवा वाढदिवस असल्याने वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी खास रुग्णांना वाटपासाठी चिवडा आणला होता. मात्र, चिवडा वाटपादरम्यान दुर्घटना घडून मुलीच्या सातव्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी संगीता यांचा मृत्यू ओढवला गेल्याने रहिवाशांच्या भावना उफाळून आल्या. 

सासू भोवळ येऊन कोसळल्या
नेहमीप्रमाणे सेवालयात सकाळी अकराला भोजन वाटपासाठी घरून निघालेली सून संगीताच्या अंगावर फांदी पडल्याची माहिती मिळताच सासूबाईंसह इतर नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालय गाठले. सुनेची अवस्था पाहताच हिराबाईंना भोवळ येऊन त्या खाली कोसळल्या. मृत संगीता यांचे पती प्रवीण रिक्षाचालक असून, ते आज खासगी वाहनाने औरंगाबादला जाणार होते. परंतु घटनेची माहिती मिळताच ते माघारी परतले. 

पोलिस चौकी निरुपयोगी 
जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून गोंधळाच्या घटना घडत आहेत. रुग्णालयात पोलिस चौकीत असले तर एक- दोन पोलिस असतात. त्यांच्याकडून जमाव नियंत्रणात येत नाही. या घटनेची माहिती कळविल्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासानंतर पोलिस हजर झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी सांगळे यांनी जमावाला शांत केले.

शल्यचिकित्सक दालन होत्याचे नव्हते
घटनेची माहिती मिळताच शेजारील तुकारामवाडीतील जमाव रुग्णालयात एकवटला. जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन देऊनही उपयोग न झाल्याने भाजप कार्यकर्ता विशाल चौधरीसह इतरांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना जाब विचारण्यासाठी दालनाकडे धाव घेतली. मात्र, दालनात कुणीही नसल्याने त्यांचा हिरमोड झाला. तेथूनच शल्यचिकित्सक डॉ. भामरेंशी फोनवरून संपर्क करण्यात आला. त्यावर दहा मिनिटांत येतो, असे सांगूनही ते न पोहोचल्याने संतप्त जमावाने दालनाची तोडफोड केली. त्यात खुर्च्या, टेलिफोन, टेबलसह भिंतीवरील घड्याळाला लक्ष्य केले.

‘मनपा’च्या ढिम्म कारभाराचा बळी
निवासी शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी धोकादायक असलेले झाड तोडण्यासाठी महापालिकेच्या वृक्षसंवर्धन विभागाला १६ ऑगस्टला अर्ज दिला होता. शहर अभियंत्याकडे अर्ज दिल्यानंतर झाड तोडण्याबाबत अहवाल देण्यात आला होता. वृक्षसंवर्धनाच्या बैठकीत हे झाड तोडण्याच्या विषयाला मंजुरी मिळणार होती. मात्र, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने ही बैठकच झाली नाही. येत्या २९ डिसेंबरला बैठक होणार होती. मात्र त्याआधीच या झाडाच्या फांदीने महिलेचा बळी घेतल्याने महापालिकेचा झाड तोडण्याचा निर्णय झाला असतानाही केवळ ढिम्म कारभारामुळे एक जीव गमवावा लागल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

Web Title: women death by notice neglect