महिला अभियंत्याला लाच घेताना पकडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

भुसावळ - इंदिरा आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुलासाठी अनुदानाचा तिसरा हप्ता देण्यासाठी कंडारी येथील मजूर महिलेकडून एक हजारांची लाच स्वीकारताना भुसावळ पंचायत समिती गृहनिर्माण विभागाच्या भाग्यश्री शिंदे या महिला अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. महिला दिनी घडलेल्या या घटनेमुळे पंचायत समिती वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत श्रीमती शिंदे यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

कंडारी (ता. भुसावळ) येथील रहिवासी तक्रारदार महिलेच्या पतीच्या नावाने इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. घरकुल अनुदानाची रक्कम ही शासनाकडून टप्प्याटप्प्याने मिळते. त्यानुसार मंजूर अनुदानाचा तिसरा हप्ता घेण्यासाठी तक्रारदार भुसावळ पंचायत समिती कार्यालयात गेल्या. तेव्हा गृहनिर्माण अभियंता श्रीमती शिंदे यांनी तक्रारदार महिलेला अनुदानाचा तिसरा हप्ता देण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला व महिला अभियंता श्रीमती शिंदे यांना हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: women engineer arrested in bribe