Nandurbar News : कळंबूत दारूबंदीसाठी महिला आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahila Gram Sabha was held at Holi Chowk

Nandurbar News : कळंबूत दारूबंदीसाठी महिला आक्रमक

कळंबू ( जि. नंदुरबार) : येथील होळी चौकात सोमवारी (ता. ६) महिला ग्रामसभा (Gram Sabha) झाली. सरपंच रामराव बोरसे अध्यक्षस्थानी होते. (Women Gram Sabha women took aggressive stand insisted on alcohol ban in village nandurbar news)

या वेळी उपसरपंच योगीराज बोरसे, ग्रामविकास अधिकारी परमेश्वर गंडे, ग्रामपंचायत सदस्य, शेतकी विद्यालयाचे प्रा. आर. एम. पटेल, पर्यवेक्षक एस. ए. संदाशिव, जिल्हा पररिषद शाळेचे मुख्याध्यापक नवल देवरे, सामुदायिक आरोग्याधिकारी राकेश पाटील, अंगणवाडीसेविका, आरोग्य कर्मचारी, आशा, मदतनीस यांच्यासह विविध स्तरांवरील गावांतील महिला उपस्थित होत्या.

या वेळी महिला ग्रामसभेत गावातील दारूबंदीच्या मुख्य मुद्द्यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विषयसूचीनुसार ग्रामविकास अधिकारी गंडे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर सभेत विविध विषयांवर चर्चा झाली.

या वेळी १ एप्रिलपर्यंत जे कुटुंब ग्रामपंचायचा कर भरणा करून सहकार्य करेल अशा कुटुंबातील महिलेचे नाव ईश्वर चिठ्ठीद्वारे निवडून त्या महिलेच्या हस्ते प्रजासत्ताक, स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात येईल,

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

१ एप्रिलपासून गावातील सर्व मिळकती/घरे पती-पत्नीच्या नावे केले जातील म्हणजे प्रत्येक घरामध्ये पत्नीचे नाव जोडले जाईल, गावात दारूबंदी व्हावी, म्हणून महिलांनी आक्रमक भूमिका घेत, दारूबंदीचा आग्रह धरला, तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठविण्याचे सभेत ठरविण्यात आले.

यांनतरही वरिष्ठांकडून दारूबंदीची दखल न घेतल्यास गावातील महिला आक्रमक होऊन संबंधित कार्यालयावर मोर्चा काढतील, असे नमूद करण्यात आले. तसेच गावातील आरोग्य, शिक्षण, सांडपाणी व्यवस्थापन, महिलांचे आरोग्य, बचतगटाद्वारे बचत करणे, प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला ५५ लिटर शुद्ध पाणी देणे, घर तेथे शौचालय व त्याचा वापर करणे,

अनधिकृत नळ कनेक्शन बंद करणे, पाण्याचा वापर जपून करणे, गाव हागणदारीमुक्त करणे आदी विषयाला अनुसरून सरपंच बोरसे यांनी सर्वानुमते ठराव नमूद केले. ग्रामविकास अधिकारी परमेश्वर गंडे यांनी महिलांविषयी शासनाची विविध ध्येयधोरणे, शासकीय योजना व त्याच्या अंमलबजावणीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

गाव कचरामुक्त होणार

इतर सोयी-सुविधांसह गावात स्वच्छता टिकावी म्हणून ग्रामपंचायतीमार्फत घंटागाडीचे नियोजनही येत्या काही दिवसांत करण्याचे योजिले असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले. प्रत्येक कुटुंबाला कचराकुंडी वाटप करून घरातील, गल्लीतील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून गाव कचरामुक्त करण्याचे स्वप्न असल्याचे सरपंच बोरसे यांनी सांगितले.