लिफ्ट बंदमुळे महिला झाली पोर्चमध्येच बाळंतीण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

नाशिक : निफाड तालुक्‍यातून रुग्णवाहिकेतून आलेल्या गर्भवती महिलेला पहिल्या मजल्यावरील प्रसुती विभागात दाखल करायचे होते. परंतु रुग्णालयाच्या दोन्ही लिफ्ट बंद होती. त्याचवेळी लिफ्टच्या बाहेर असलेल्या पोर्चमध्येच महिलेला जोराची कळ आली आणि ती बाळंतिण झाली. सदरची बाब रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच तात्काळ धावाधाव झाली आणि तिच्यावर जागेवरच उपचार करण्यात आले. त्यानंतर लिफ्ट बंद असल्याने तिला झोळी करून पहिल्या मजल्यावरील प्रसुतीपश्‍चात कक्षात दाखल करण्यात आले.

नाशिक : निफाड तालुक्‍यातून रुग्णवाहिकेतून आलेल्या गर्भवती महिलेला पहिल्या मजल्यावरील प्रसुती विभागात दाखल करायचे होते. परंतु रुग्णालयाच्या दोन्ही लिफ्ट बंद होती. त्याचवेळी लिफ्टच्या बाहेर असलेल्या पोर्चमध्येच महिलेला जोराची कळ आली आणि ती बाळंतिण झाली. सदरची बाब रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच तात्काळ धावाधाव झाली आणि तिच्यावर जागेवरच उपचार करण्यात आले. त्यानंतर लिफ्ट बंद असल्याने तिला झोळी करून पहिल्या मजल्यावरील प्रसुतीपश्‍चात कक्षात दाखल करण्यात आले. दरम्यान, सदरच्या घटनेमुळे पुन्हा सिव्हीलमधील लिफ्टचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून त्यामुळे सदरील महिलेच्या जीवावर बेतण्याची शक्‍यता होती. 

सुगंधा भावराव जाधव (वय 26 मूळ रा. खांडगाव, ता. निफाड) या गर्भवती महिलेला आज सकाळी शिंपी टाकळी (ता. निफाड) येथून रुग्णवाहिकेतून जिल्हा सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. तिला प्रसुतीकळा सुरू असल्याने तिला तात्काळ प्रसुती कक्षात दाखल करावयाचे होते. पोर्चमधील दोन्ही लिफ्ट बंद असल्याने स्ट्रेचरवरील गर्भवती सुगंधा जाधव यांना प्रसुतीसाठी पहिल्या मजल्यावर नेणे आवश्‍यक होते. दरम्यान, त्याचवेळी सुगंधाच्या पोटात जोराची प्रसुतीकळ आली, आणि ती बाळंतिण झाली. सदरची बाब आहार विभागाच्या कर्मचारी शिला कांबळे यांनी पाहिले आणि त्यांनी धावत जाऊन बाळंतिणीला सावरले. तसेच, लगतच्या आपत्कालिन कक्षातील परिचारिकांना आवाज दिला. त्यासरशी सारे धावले. पोर्चमध्ये काही पुरुष असल्याने शिला कांबळे यांनी साऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितले. दोन्ही बाजूकडील गेट बंद करण्यात आले आणि अडोसा केला. प्रसुती विभागातील परिचारिकांनी लिफ्टच्या बाहेरच गोंडस बाळाला जन्म दिलेल्या सुगंधावर उपचार केले. त्यानंतर वॉर्ड बॉय यांनी झोळी करून तिला प्रसुतीपश्‍चात कक्षात दाखल केले. तोपर्यंत अडीच किलो वजन असलेल्या गोंडस बाळावर उपचार करून मातेकडे सोपविले गेले. तिच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडत होता. तर तिच्यावर उपचार करणारे परिचारिक, शिला कांबळे यांचेही तीने आभार मानले. 

लिफ्टचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर 
दरम्यान, रुग्णालयातील दोन्ही लिफ्ट या शनिवारी (ता.15) दुपारपासून बंद आहे. त्यामुळे रुग्णांना झोळी करूनच वरच्या मजल्यावर न्यावे लागते आहे. सदरची गर्भवती महिला लिफ्टच्या बाहेरच बाळंतिण झाली असली तरी लिफ्ट बंद असल्याने ते तिच्या जिवावरही बेतू शकले असते. तसेच अनेक गंभीर रुग्ण दाखल होत असताना त्यांना वरच्या चार मजल्यांवर दाखल करताना गैरसोयही होते आहे. 

बंद लिफ्टबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्युत विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला असून ती लवकर सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी तात्काळ गर्भवती महिलेवर उपचार केले असून त्यांचे कौतूकच आहे. - डॉ. निखिल सैंदाणे, प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

Web Title: women Pregnant in porch Due to Lift closed