पुरेसे पैसे न मिळाल्याने महिलेने केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

नंदुरबार - नोटाबंदीनंतर देशभरात कुठे रांगांमध्ये, तर कुठे पैसे मिळत नसल्याने अनेकांचा बळी गेल्याची चर्चा रोजच रंगवली जात असताना खानदेशात नोटबंदीने आज दुसरा बळी घेतला. मुलाचे लग्न तोंडावर असताना बॅंकेतून पुरेसे पैसे न मिळाल्याने कर्जबाजारी महिलेने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. कलमाडी (ता. नंदुरबार) येथे आज पहाटे ही घटना घडली. मालूबाई मोतीलाल पाटील (वय ५५) असे तिचे नाव आहे. यापूर्वी निंभोरा (ता. रावेर) येथे रांगेत उभा राहिल्याने अत्यवस्थ झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला होता.

एकीकडे डोक्‍यावर शेतीचे कर्ज झाले आहे, तिकडे बॅंकेतून पुरेसे पैसे मिळत नाहीत. आता मुलाचे लग्न तोंडावर असताना विवाहासाठी पैसे कमी पडत होते. या स्थितीला कंटाळून मालूबाईंनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक भोये, उपनिरीक्षक घोरपडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. 

कायदेशीर सोपस्कार पार पाडून मालूबाईंचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. तेथे नातेवाइकांनी गर्दी केली. यावेळी महिलेच्या नातेवाइकांनी दोषींवर कारवाईची मागणी केली, अन्यथा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्याचा इशारा दिला. उद्‌भवलेली स्थिती पाहता पोलिस निरीक्षक गिरीश पाटील यांचे पथक जिल्हा रुग्णालयात पोचले. त्यांनी नातेवाइकांचे शिष्टमंडळ आणि जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यात चर्चा घडवून आणली. श्री. कलशेट्टी यांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याशी संवाद साधला. श्री. रावल यांनी या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन देत नियमानुसार मृताच्या वारसास मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर मालूबाईंचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: women suicide for money