शेकडो मैलांची तिची' धावपळ अपयशी

संजीव निकम
गुरुवार, 9 मार्च 2017

प्रेमविवाहामुळे नातेवाईकही कमी 
मीरादेवी मूळची बिहारची. राजधानी दिल्लीत ओळख झालेल्या माधवशी तिचा प्रेमविवाह झालेला. नगरला काम शोधायला आलेल्या माधवचा प्रवास नांदगावमध्ये कायमचा संपला. पोलिस हवालदार इघे यांनी पतीचा अंत्यविधी कुठे करायचा, असे विचारले. पतीचा मृतदेह दूर दिल्लीला नेऊन अंत्यविधी तरी कसा करायचा? कारण जवळचे म्हणून नातेवाईक कुणीच नसल्याने मोजक्‍या मित्रांची येण्याची वाट पाहावी लागली असती.

नांदगाव - प्रेम सर्वच जण करतात; पण प्रेम निभावणे सर्वांना जमतेच, असे नाही. पण, दिल्लीजवळील न्यू नोएडा येथे राहणाऱ्या मीरादेवी या नवविवाहितेने मात्र प्रेम, यातना आणि धीराचा परिचय देत सर्वांचेच मन हेलावून टाकले. जखमी पतीला भेटायला आलेल्या मीरादेवीला अचानक पतीच्या मृत्यूची वार्ता कळली. क्षणभर आपल्यावर आभाळच कोसळल्याचा भास तिला झाला. पण, या दुःखाच्या क्षणातही स्वतःला सावरत जोडीदाराला नांदगावमध्येच अखेरचा निरोप देण्याचा धाडसी निर्णय घेऊन तिने आपल्या कणखरपणाचा परिचय करून दिला. या घटनेचे साक्षीदार असलेल्यांचे यामुळे हृदय हेलावून गेले. 

साऱ्या देशभर महिलादिन उत्साहात साजरा होत असताना महिलांनी संकटात उभे कसे राहावे, याचा वस्तुपाठच मीरादेवीच्या रुपाने नांदगावच्या रेल्वेस्थानकावर पाहायला मिळाला. नवी दिल्लीच्या न्यू नोएडा भागात राहणाऱ्या तरुण विवाहितेची ही कहाणी. पाच मार्चला न्यायडोंगरीच्या रेल्वेरुळावर गोवा एक्‍स्प्रेसमधून माधव बिस्वास हा पस्तीशीचा तरुण धावत्या गाडीतून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या वेळी ड्यूटीवरील वाल्मीक पवार यांनी पोलिसांना माहिती दिली. मृताच्या खिशातील कागदपत्रांच्या आधारे माधवच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात आला. दूरध्वनी क्रमांक, आधारकार्ड व मोबाईल असल्याने हा शोध घेणे अवघड गेले नाही. पश्‍चिम बंगालमधील माधवच्या आई-वडिलांसह त्याच्या पत्नीलाही कळविण्यात आले. मात्र, तो मृत झाल्याचे सांगण्यात आले नव्हते. 

दिल्लीच्या न्यू नोएडा भागात मीरादेवी आपल्या तीन लेकरांसह राहत होती. अपघाताचे वृत्त कळताच ती तीन वर्षांच्या मुलाला घेऊन नांदगावला निघाली. एकट्या-दुकट्या महिलेला सोबत मिळाली, ती शेजारी राहणाऱ्या माधवच्या एका मित्राची. आज सकाळी नांदगाव रेल्वेस्थानकावर हे दोघे उतरले. पतीला कुठल्या रुग्णालयात ठेवले आहे, असे ती विचारू लागली. रेल्वे पोलिस शिवाजी इघे यांना, मीराबाईला ही घटना कशी सांगावी, हेच कळत नव्हते. पण, शेवटी तिला धीर देत त्यांनी सांगितले, की माधव आता या जगात नाही, हे ऐकून तिच्यावर आभाळच कोसळले. हृदयाला पिळवटून टाकणाऱ्या तिच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले. 

प्रेमविवाहामुळे नातेवाईकही कमी 
मीरादेवी मूळची बिहारची. राजधानी दिल्लीत ओळख झालेल्या माधवशी तिचा प्रेमविवाह झालेला. नगरला काम शोधायला आलेल्या माधवचा प्रवास नांदगावमध्ये कायमचा संपला. पोलिस हवालदार इघे यांनी पतीचा अंत्यविधी कुठे करायचा, असे विचारले. पतीचा मृतदेह दूर दिल्लीला नेऊन अंत्यविधी तरी कसा करायचा? कारण जवळचे म्हणून नातेवाईक कुणीच नसल्याने मोजक्‍या मित्रांची येण्याची वाट पाहावी लागली असती. संकटात आपल्याला एकट्यालाच उभे राहायचे आहे. पतीशिवाय जगण्याची लढाई आजपासून लढायची आहे, हे ओळखून तिने नांदगावलाच पतीचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. अन्‌ महिलादिनीच घडलेल्या या घटनेने उपस्थितांची मने हेलावली. 

Web Title: women travel noida to nandgaon