छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगाला प्रेरणादायी : सुमंत टेकाडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रत्येकाचे स्फूर्तीदायी दैवत आहे. कुशल नेतृत्व, कर्तुत्व, संघटन, सावधानता हे गुण महाराजांच्या अंगी होते. प्रजाहितदक्ष, एक प्रखर योद्धा, कुशल राज्यकर्ता, उदार व लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन शिवचरित्र व्याख्याते सुमंत टेकाडे यांनी केले.

सटाणा: छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रत्येकाचे स्फूर्तीदायी दैवत आहे. कुशल नेतृत्व, कर्तुत्व, संघटन, सावधानता हे गुण महाराजांच्या अंगी होते. प्रजाहितदक्ष, एक प्रखर योद्धा, कुशल राज्यकर्ता, उदार व लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन शिवचरित्र व्याख्याते सुमंत टेकाडे यांनी केले.

दगाजी सिनेमंदिरात काल सोमवार (ता.2) रोजी रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण, देवळा टाऊन व रोटरेक्ट क्लब ऑफ सटाणा बागलाणच्या पदग्रहण सोहळ्यात टेकाडे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल राजीव शर्मा, उपप्रांतपाल राकेश डीडवानिया आदी उपस्थित होते. टेकाडे म्हणाले, महाराजांचे कार्य दैदिप्यमान आहे. त्यांनी अन्यायाविरूद्ध आवाज उठवून स्वकियांमध्ये आत्मसन्मान जागविला. अद्वितीय योद्धा म्हणून महाराज जगभर परिचित आहेत. गनिमी काव्याचा प्रभावी उपयोग केला, देशात सर्वप्रथम नौसेनेची स्थापना केली, अनेक गड किल्ले उभारले. जातपात, धर्म यापेक्षा त्यांनी आपल्या राज्यकारभारात कतृत्वाला महत्व दिले. त्यांच्या राज्यात महिलांना सन्मानाची वागणूक दिली जात असे.

सर्वाना एकत्र घेऊन त्यांनी बलाढ्य शत्रूचा सामना केला. अफजलखानाची फटफजिती करून यमसदनास पाठविले. आपल्या मावळ्यांच्या जीवाच्या बळावर त्यांनी अटक ते कटकपर्यंत राज्याचा विस्तार केला, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नूतन अध्यक्ष प्रदीप बच्छाव, सचिव अभिजित सोनवणे, देवळाचे अध्यक्ष कौतिक पवार, सचिव प्रीतेश ठक्कर, रोटरेक्ट क्लबच्या अध्यक्ष अक्षदा सूर्यवंशी तर सचिव योगेश जाधव यांना पदभार सुपूर्द करण्यात आला. अध्यक्ष श्री.बच्छाव, श्री. पवार, अक्षदा सूर्यवंशी यांनी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शेतकऱ्यांसाठी प्रदूषणविरहीत, सुरक्षित असलेले आणि कमी खर्चाचे 'ब्लोअर स्प्रेयर' या कीटकनाशक फवारणी यंत्राचे संशोधन करणाऱ्या येथील संशोधक राजेंद्र जाधव यांना 'रोटरी भूषण' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रोटरीला विकासकामांसाठी ५० हजार रुपयांचा निधी देणारे प्रल्हाद पाटील, पीएचडी पदवी मिळविणारे प्रा. राजेंद्र वसईत, सुदर्शन सूर्यवंशी (दहावी परीक्षा, तालुक्यात प्रथम) यांचा प्रांतपाल राजीव शर्मा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ सटाणामधील नूतन सदस्य प्रसाद सोनवणे, प्रशांत रौंदळ, बाळासाहेब ठाकरे, डॉ. कुलदीप जाधव, सचिन भामरे, राजेश सोनवणे, तेजस वाघ तर देवळ्याचे सतीश बच्छाव, माणिक सोनजे यांना पीन प्रदान करण्यात आली. यावेळी प्रा. बी. डी. बोरसे यांनी संपादित केलेल्या व योगेश अहिरे यांनी मांडणी केलेल्या 'दिशा' या रोटरीच्या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास नगराध्यक्ष सुनील मोरे, डॉ. प्रकाश जगताप, मविप्र संचालक विश्राम निकम, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, हितेंद्र आहेर, मनोज जाधव, वसंत आहेर, शैलेश सूर्यवंशी, प्रा. शं. क. कापडणीस, सतीश कलंत्री, पी. आर. जाधव, पी. आर. जाधव, एड. सोमदत्त मुंजवाडकर, सोपान खैरनार, भगवान आहेर, नंदकिशोर शेवाळे, प्रमोद पाटील, रामदास पाटील, बी. के. पाटील, आप्पा कुलकर्णी, डॉ. मनोज शिंदे, प्रशांत भामरे, डॉ. अमोल पवार, महेश सूर्यवंशी, नितीन मगर, उमेश सोनी, सीमा सोनवणे, ज्योती जाधव, सरोज चंद्रात्रे, महेश देवरे, राकेश खैरनार, दत्तू बैताडे, दीपक पगार, अंबादास अहिरे, डॉ. विद्या सोनवणे, व्ही. डी. सोनवणे, जे. एन. बच्छाव, धनंजय जाधव आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. मावळते अध्यक्ष डॉ. उमेश बिरारी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. बी. डी. बोरसे व अंजली जगताप यांनी सूत्रसंचालन केले. सचिव अभिजित सोनवणे यांनी आभार मानले.

Web Title: The work of Chhatrapati Shivaji Maharaj is inspiring to the world says sumant tekade