कामगारदिनी मुंबईत कामगारांचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

नाशिक - कामगार दिनानिमित्त 1 मे रोजी सत्कार, मेळावे व मिरवणुका याऐवजी यंदा संपाचा इशारा देत मोर्चा काढण्याचे नियोजन केले जात आहे. मुंबईत एक लाख कामगारांचा मोर्चा काढून कामगारविरोधी धोरणाचा कडाडून निषेध केला जाणार आहे. दर वर्षी आंतरराष्ट्रीय कामगारदिनी बंद, संप, आंदोलन, उपोषण न करता हा दिवस उत्साहात करण्याकडे कामगार संघटनांचा कल असतो. मात्र, सध्याच्या कामगारविरोधी वातावरणामुळे कामगार संघटनांनी उत्सवी कार्यक्रमांऐवजी आंदोलनाचा निर्णय घेतला. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे ज्येष्ठ नेते र. ग. कर्णिक यांनी नुकतीच बैठक घेऊन एक मेस मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे, त्यात सरकारी कर्मचाऱ्यांसह सीटू, आयटक, इंटक या कामगार संघटनांनी पाठिंबा दिला.
Web Title: worker rally at worker day