कार्यकर्त्यांचा दिवस जातोय आकडेवारीत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

अमळनेर - जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारांचे भवितव्य "इव्हीएम' मशिनमध्ये बंद झाले आहे. आता निकालाची उत्सुकता साऱ्यांनाच लागली असून समर्थकांसह कार्यकर्त्यांचा दिवस आकडेवारीत जातो आहे. तर उमेदवार "विजय आपलाच आहे, गुलाल तयार ठेवा' असा विश्‍वास व्यक्‍त करत आहेत. गुरुवारी (ता. 23) होणाऱ्या मतमोजणीकडे आता लक्ष लागले आहे. 

अमळनेर - जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारांचे भवितव्य "इव्हीएम' मशिनमध्ये बंद झाले आहे. आता निकालाची उत्सुकता साऱ्यांनाच लागली असून समर्थकांसह कार्यकर्त्यांचा दिवस आकडेवारीत जातो आहे. तर उमेदवार "विजय आपलाच आहे, गुलाल तयार ठेवा' असा विश्‍वास व्यक्‍त करत आहेत. गुरुवारी (ता. 23) होणाऱ्या मतमोजणीकडे आता लक्ष लागले आहे. 

अमळनेर व पारोळ्यात चार गट व आठ गण, धरणगाव व एरंडोलला प्रत्येकी तीन गट व सहा गणांसाठी, तर चोपड्यात सहा गट व बारा गणांसाठी मतदान घेण्यात आले. यात अमळनेरला 59. 06, धरणगाव 65.59, एरंडोलला 62.75, पारोळ्यात 65.32, तर चोपड्यात 66.17 टक्के मतदान झाले आहे. उमेदवारांचे भवितव्य इलेक्‍ट्रॉनिक्‍स मतदान यंत्रात बंद झाले असून, निकालाची प्रतीक्षा लागली आहे. सर्व पक्षांचे उमेदवार, समर्थक व कार्यकर्ते मतदानाच्या आकडेवारीवरून आपल्या विजयाचे गणित मांडताना दिसून येत आहेत. मतमोजणीपूर्वी ग्रामीण भागातील चौका- चौकात, उमेदवारांच्या घर व परिसरात घोळकेच्या घोळके दिसून येत आहेत. या भागात इतका लीड, त्या भागात तितका लीड राहील आदी चर्चांना चांगलाच ऊत आला आहे. अनेक जणांनी नियोजनपूर्ण "अर्थ' व्यवस्था केल्यानेही विजयाचा हमखास दावा होताना दिसून येत आहे. त्यातच स्थानिक पातळीवर ही निवडणूक कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठेची केल्याने गावागावात संबंधित उमेदवारांचा विजयाचा विश्‍वास व्यक्‍त होत आहे. ग्रामीण भागात या चर्चा असल्या तरी अनेक उमेदवारांची घरे ही शहरांमध्ये असल्याने त्यांच्या घर व परिसरात रोज कार्यकर्ते व समर्थकांची गर्द दिसून येत आहे. मात्र, कोण विजयी होतो हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. 

मतदानाचा टक्‍का वाढला 
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का हा वधारला आहे. अमळनेर परिसरातील अनेक गट व गणांमध्ये चुरशीच्या लढती आहेत. यामुळे धक्कादायक निकालही लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. अनेक ठिकाणी उमेदवार हे अल्पमतांनी विजयी होण्याचा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वांचेच डोळे आता निकालाकडे लागले आहेत. 

Web Title: Workers day wonder Statistics