राज्यात ‘गाव तिथं मानसोपचार’ अभियान

नरेंद्र जोशी
सोमवार, 1 एप्रिल 2019

राज्यातील २८ जिल्ह्यांतील मानसोपचार तज्ज्ञ हे ७ एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनापासून ‘गाव तिथं मानसोपचार तज्ज्ञ’ हे अभियान राबविणार आहेत. त्यात मानसिक स्वास्थाविषयीची जनजागृती केली जाईल. हे अभियान प्रामुख्याने ग्रामीण भागात राबवले जाणार आहे.

नाशिक - राज्यातील २८ जिल्ह्यांतील मानसोपचार तज्ज्ञ हे ७ एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनापासून ‘गाव तिथं मानसोपचार तज्ज्ञ’ हे अभियान राबविणार आहेत. त्यात मानसिक स्वास्थाविषयीची जनजागृती केली जाईल. हे अभियान प्रामुख्याने ग्रामीण भागात राबवले जाणार आहे.

शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य हे सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. आजही मानसिक स्वास्थ्य आणि त्याच्याशी निगडित आजारांविषयी, त्यांच्या उपचाराविषयी गैरसमज आहेत. ग्रामीण भागात हे गैरसमज अधिक प्रमाणात आहेत. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ लोक मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याअगोदर अंधश्रद्धा अथवा इतर अपारंपरिक बुवाबाजीचा वापर करतात. मानासिक आजार हे शारीरिक आजारांसारखेच आजार आहेत आणि मानसोपचार इतर उपचारांसारखा सहज व सोपा आहे. वेळीच मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतल्यास मानसिक आजार बरे होऊ शकतात.

याविषयी जनजागरण अभियानातून केले जाईल. त्यासाठी राज्यातील समविचारी माससोपचार तज्ज्ञांनी एकत्र येऊन या समाजप्रबोधनाच्या जनजागृती अभियानाची सुरवात करण्याचे ठरवले आहे. या अभियानाची संकल्पना नैराश्‍य एक मानसिक आजार ही आहे. त्यासाठी नाशिकचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. उमेश नागापूरकर व हेमंत सोननीस यांचा पुढाकार आहे.

अभियानाची सुरवात होणारी गावे
कोळपेवाडी, शिराळ, (नगर), अकोली-चांदोरी (अमरावती), जाटवाडा, मालीवाडा, औरंगाबाद, पैठण, (औरंगाबाद), जाम्बोरा (बुलडाणा), नरडाणा (धुळे), मुरबाड (कल्याण), तळसंदे, पोर्ले (कोल्हापूर) शीतळवाडी-रामटेक (नागपूर), अंजनेरी, मखमलाबाद, नाशिक, निफाड (नाशिक), पावना, सरसोळे (नवी मुंबई), भूम (उस्मानाबाद), घोडेगाव, लोणी, मांजरी, नंदोशी (पुणे), चिपळूण (रत्नागिरी), आष्टा (सांगली), विखले (सातारा), मंगळवेढा, कासेगाव (सोलापूर), अंजी (वर्धा), अर्नाळा, विरार, कळंबा, पुसद (वाशिम), वर्थी (भंडारा).

Web Title: World Health Day Campaign Village Health