"चिव-चिवाट' टिकविण्यासाठी हवी सामान्यांची साथ 

अरुण मलाणी
सोमवार, 20 मार्च 2017

नाशिक - बाल्कनी, गच्ची, मोकळ्या जागेत पाण्याची भांडी ठेवत.. झाडाच्या फांद्या, अडगळीच्या ठिकाणी घरटे बनवत.. अशा अगदी सोप्या उपाययोजनांतून चिमणीचे अस्तित्व टिकवता येऊ शकते. वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने घटत असून ही चिंतेची बाब मानली जात आहे. चिमण्यांचा चिवचिवाट टिकविण्यासाठी विविध सामाजिक, पर्यावरणवादी संस्था उपक्रम राबवत असून, त्यांना सर्वसामान्यांची साथ लाभण्याची अपेक्षा आहे. 

नाशिक - बाल्कनी, गच्ची, मोकळ्या जागेत पाण्याची भांडी ठेवत.. झाडाच्या फांद्या, अडगळीच्या ठिकाणी घरटे बनवत.. अशा अगदी सोप्या उपाययोजनांतून चिमणीचे अस्तित्व टिकवता येऊ शकते. वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने घटत असून ही चिंतेची बाब मानली जात आहे. चिमण्यांचा चिवचिवाट टिकविण्यासाठी विविध सामाजिक, पर्यावरणवादी संस्था उपक्रम राबवत असून, त्यांना सर्वसामान्यांची साथ लाभण्याची अपेक्षा आहे. 

जागतिक चिमणी दिन 2010 पासून साजरा केला जात आहे. वाढत्या शहरीकरणात अन्य प्राण्यांच्या प्रजातीप्रमाणेच चिमणीचे अस्तित्वदेखील धोक्‍यात आले आहे. वाढत चाललेल्या सिमेंटच्या जंगलात अन्न व निवाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होत असल्याने चिमण्यांची संख्या घटू लागली आहे. चिमण्यांच्या घटत्या संख्येवर चिंता व्यक्‍त करत राज्य स्तरावरील विविध संस्था उपक्रमांच्या माध्यमातून चिऊताईला वाचविण्यासाठी अथक प्रयत्न करतायत. मात्र जीवसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या चिऊताईचे अस्तित्व टिकविण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न होण्याची गरज व्यक्‍त केली जाते आहे, त्यासाठी सामान्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. अन्यथा काही दिवसांत चिमणी केवळ चित्रकलेचा विषय राहील. पुढच्या पिढीला चिमणीविषयीची माहिती केवळ गुगल या सर्च इंजिनवर मिळू शकेल, अशी भीती व्यक्त होतेय. 

पाणी, फीडर अन्‌ घरटी 
अगदी साध्या व सोप्या पद्धतीने चिमणीचे अस्तित्व टिकविता येऊ शकते, असे पक्षिप्रेमींचे म्हणणे आहे. फ्लॅटच्या गॅलरीत, गच्चीत, खिडकीच्या छपरावर अशा विविध ठिकाणी पाण्याने भरलेली वाटी किंवा अन्य वस्तू ठेवता येऊ शकते. चिमणीला एकवेळ अन्न मिळाले नाही तरी चालेल; पण तहान भागल्यास ती जगू शकेल, असे पक्षिप्रेमी सांगतात. झाडाच्या फांद्यांवर, अडगळीच्या ठिकाणांसह शक्‍य त्या ठिकाणी छोटेसे घरटे बांधल्यास तेथे चिमणी राहू शकते. सध्या बाजारात तयार घरटे मिळू लागले आहे. थोडासा खर्च करत या घरट्यांची खरेदी केल्यास चिमणीच्या निवाऱ्याची व्यवस्था होऊ शकेल. बाजारात सध्या "फीडर' उपलब्ध झाले आहेत. यात बाजरी, ज्वारी असे धान्य भरलेले फीडर गच्चीवर किंवा अन्य ठिकाणी ठेवल्यास चिमण्यांना दाणा टिपणे सोपे होईल. केवळ पक्षिप्रेमी, संस्थांनी योगदान देऊन होणार नाही. सर्वसामान्यांनीही त्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्‍यकता व्यक्‍त केली जातेय. 

नेचर क्‍लब नाशिकच्या माध्यमातून सदस्यांनी स्वखर्चाने चौक, झाडांच्या फांद्या, घरातील गच्ची अशा विविध ठिकाणी पाणी, फीडरसह घरट्याची व्यवस्था करण्याचा प्रयोग राबविला. म्हणून गेल्या तीन वर्षांत शहरात थोड्याफार प्रमाणात चिवचिवाट ऐकायला मिळतोय. वाढत्या सिमेंटच्या जंगलात चिमणीचे अस्तित्व धोक्‍यात आले असून, सामान्यांच्या प्रयत्नातूनच चिमणी टिकू शकेल. 
- चंद्रकांत दुसाने (नेचर क्‍लब, नाशिक) 

Web Title: World Sparrow Day