सातपूरमध्ये 1 जूनला रंगणार कुस्त्यांची दंगल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

मी स्वत: कुस्ती शिकण्यासाठी जवळपास दीड वर्ष कोल्हापूर व भगूरच्या बलकवडे तालमीत वास्तव्यास होतो. नाशिक जिल्ह्यातील युवकांत गुणवत्ता आहे. त्यांना वाव मिळण्यासाठी कुस्ती स्पर्धा घेतली आहे. 
- विष्णू पाटील, कुस्तीपटू 

नाशिक - कुस्तीचा प्रचार-प्रसार, तसेच पहिलवानांना कुस्तीतील कौशल्य सादर करण्याची संधी व त्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नगरसेवक दिनकर पाटील यांनी त्यांचे लहान बंधू व बांधकाम व्यावसायिक तथा कुस्तीपटू विष्णू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजीनगरमधील (सातपूर) कार्बन नाका येथे 1 जूनला कुस्त्यांची दंगल आयोजित केली आहे. 

पूर्वी प्रत्येक घरात किमान एकतरी मल्ल असावा, अशी प्रथा होती. बदलत्या काळानुसार ती लोप पावत चालली आहे. बोटावर मोजण्याइतक्‍या देशांत खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटला प्रसिद्धी व पैसा अधिक मिळत आहे. पण जगातील जवळपास सर्वच देशांत कुस्ती खेळ खेळला जातो. तरीही क्रिकेटच्या तुलनेत काहीच प्रसिद्धी मिळत नाही. कुस्ती हा खेळ फक्त शारीरिक ताकदीचा आहे. यात बुद्धी व कौशल्याचा काहीही संबंध नाही, असा गैरसमज आहे. त्यामुळे कुस्तीपटूंकडे संकुचित वृत्तीने बघितले जाते. खरेतर कुस्ती हा खेळ शारीरिक ताकद, एकाग्रता व बुद्धीचा एकत्रित वापर करून खेळला जाणारा खेळ आहे. आपण आपल्या जीवनात किमान एकतरी मैदानी खेळ खेळला पाहिजे. कुस्ती ही आपली परंपरा आहे. ती आपणच जतन करणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कुस्तीत करिअरदेखील करता येते. यात विशेष प्रावीण्य मिळविल्यास सरकारी नोकरी, सन्मान व प्रतिष्ठा मिळते. दुर्लक्षित होणाऱ्या या खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी कुस्तीपटू विष्णू पाटील यांनी वाढदिवसानिमित्त 1 जूनला कुस्त्यांची दंगल आयोजित केली आहे. दिनकर व विष्णू पाटील कुटुंबीय 1982 पासून कुस्तीच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यरत आहेत. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ते दर वर्षी कुस्त्यांच्या स्पर्धा घेतात. यंदा 1 जूनला दुपारी तीनपासून कुस्त्यांचा फड रंगेल. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जातील. 

Web Title: Wrestling on 1st June in Satpur