अखेर पालकांची मुख्याध्यापकांकडे लेखी तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

जळगाव - शहरातील एका नामवंत शाळेच्या शिक्षकाकडून विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर याप्रकरणी पालकांनी तक्रार दिल्यावरच कारवाई करता येऊ शकते, असा पवित्रा संस्थाचालकांनी घेतला होता. आता मात्र, पालकांनी यासंदर्भात लेखी तक्रार दिली असून संस्था संबंधित शिक्षकावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, या तक्रारीवर कारवाई झाली नाही तर पोलिसांकडेही निवेदन देण्याची तयारी पालकांनी दर्शवली आहे.

जळगाव शहरातील एका लौकिकप्राप्त शाळेच्या शिक्षकाने शाळेतीलच नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. या विकृत शिक्षकाने विद्यार्थ्यांना मोबाईलमध्ये अश्‍लील क्‍लीप दाखवून त्यांच्यासोबत गैरप्रकार केला. संस्थेने हे प्रकरण दडपण्यासाठी पालकांनी तक्रार करु नये म्हणून त्यांच्यावर दबाव आणल्याचीही चर्चा होती. नंतर मात्र संस्थाचालकांनी यासंदर्भात पालकांनी तक्रार दिल्यास कारवाई करण्याचा पवित्रा घेतला होता. "सकाळ'ने गेल्या तीन दिवसांपासून हे प्रकरण लावून धरले आहे. त्याची दखल घेत शाळेने संबंधित शिक्षकाला मेमो देत सक्तीच्या रजेवरही पाठविले आहे.

पालकांची तक्रार
दरम्यान, या प्रकरणात पालकांतर्फे शाळेच्या मुख्याध्यापकांना लेखी स्वरुपात तक्रार देण्यात आली असून आता कारवाईची प्रतीक्षा आहे. शाळेच्या व्यवस्थापनातर्फे कारवाईनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल होतो की, केवळ संस्था पातळीवर कारवाई करुन प्रकरण दाबले जाते याकडे लक्ष लागून आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांकडे लेखी तक्रार करण्यात आली असून शाळा व्यवस्थापन या तक्रारीवर कारवाई करणार असल्याचे वृत्त आहे.

...तर पुढचे पाऊल उचलू
पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला असता, त्यांनी घडल्या प्रकाराची लेखी तक्रार मुख्याध्यापकांना देण्यात आल्याचे सांगितले आहे. शाळा व्यवस्थापनाने योग्य दखल न घेतल्यास आम्ही पुढचे पाऊले उचलण्यास मोकळे असल्याचेही या पालकांचे म्हणणे आहे.

Web Title: written complaint to the principal for parents