सातपुडातून येते अदृष्य ज्योत...अन्‌ मंदिरात घडतो चमत्कार ! 

atraval.
atraval.

यावल : सातपुडा पर्वत रांगातून एक अदृश्‍य ज्योत येते व मुंजोबा देवस्थानावर वाहिलेले लोणी, व इतर निर्माल्य आपोआप पेट घेते अशी आख्यायिका असलेल्या व जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द असलेले अट्रावल (ता. यावल) येथे मुंजोबा मंदिरात शनिवारपासून (ता. 25) यात्रोत्सव सुरू होत आहे. जिल्ह्यात हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून येथे जिल्ह्यासह राज्यातून भाविक येथे येत असतात. 

अट्रावल येथील मुंजोबा मंदिर पुरातन असून किमान तीन -साडे तीनशे वर्षापूर्वीचे असल्याचे वृद्ध, जाणकार सांगतात. अट्रावल- भालोद रस्त्यावर रस्त्याच्या कडेला एका ओट्यावर असलेल्या मंदिरास पूर्वी पत्री शेड होते. तेथे आता स्लॅबचे शेड आहे. मंदिराच्या देखभालीसाठी कोळी समाजाचे विश्वस्त मंडळ 1983 पासून कार्यरत आहे. दरवर्षी माघ शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत दर शनिवारी व सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात असलेल्या शेतांमध्ये मान देणाऱ्या (नवस फेडणे) भाविकांचीही गर्दी असते. शेतात सोयीची जागा मिळण्यासाठी महिना -दोन महिने अगोदरच मान देणाऱ्या भाविकांना जागा निश्‍चित करावी लागते. नवस फेडणारे मंदिरावर पितळी घंटा दान म्हणून देण्याची परंपरा आहे. मुंजोबास दहीभात चढवून मंदिर परिसरात वरण बट्टी व चुरम्याचा नैवेद्य दाखवितात. . 
यात्रोत्सव म्हटला म्हणजे पाळणे, खाऊची दुकाने, संसारोपयोगी वस्तूंची दुकाने लावण्यात आलेली असतात. माघ महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत येथे यात्रा असते. यात्रोत्सव काळात मुंजोबावर वाहिलेले लोणी, पूजाअर्चाचे निर्माल्य साहित्य माघ पौर्णिमेनंतर फाल्गुन पौर्णिमेपर्यंत आपोआप जळून खाक होते. 

यात्रोत्सवासाठी जादा बसेस 
मुंजोबा यात्रोत्सव हा 25 जानेवारी, 27 जानेवारी, 01 फेब्रुवारी, 03 फेब्रुवारी, 08 फेब्रुवारी 25 ते असा असून यावल एस. टी. आगारातून आठ ते दहा जादा विशेष बसेस या मार्गावर धावतात. याशिवाय रावेर, भुसावळ, जळगाव, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर आगारातून जादा बसेस सोडण्यात येतात. 

भरीव मदतीची गरज 
भाविकांच्या देणगीवर अवलंबून असलेल्या विश्वस्त मंडळास इच्छा असूनही विकासात्मक कामे करता येत नाही. जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा देवून विकासकामांसाठी भरीव मदत देत असताना अट्रावलच्या मुंजोबा मंदिरावरही शासनाची मेहेरनजर व्हावी अशी भाविकांची अपेक्षा आहे. 

असे जावे अट्रावला...! 
यावल येथून सहा किलोमीटर व अट्रावल- भालोद रस्त्यावर अट्रावल गावाजवळून पूर्वेस दोन किलोमीटर अंतरावर एस.टी. बसने, खासगी वाहनाने जाता येते, याशिवाय भुसावळ- यावल रोडवर राजोरा फाट्यावरून अट्रावल येथे जाता येते. 

मुंजोबा देवस्थान कोळी पंच मंडळ 
अध्यक्ष- ललित कोळी, उपाध्यक्ष- दीपक कोळी, खजिनदार- बाबूराव कोळी, सचिव- भास्कर कोळी, उपसचिव- विक्रम कोळी, सदस्य- प्रभाकर कोळी, अनिल कोळी, जनार्दन कोळी, दिनकर कोळी, बबन कोळी, जगन कोळी, कडू कोळी, सुपडू कोळी.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com