आंध्र प्रदेशातील पाच साईभक्त येवल्याजवळ अपघातात ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

सात जण जखमी; कंटेनरची टाटा मॅजिकला धडक

सात जण जखमी; कंटेनरची टाटा मॅजिकला धडक
येवला - आंध्र प्रदेशातून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात असलेल्या दोन कुटुंबांवर काळाने झडप घातली. नगर-मनमाड महामार्गावर अंचलगाव रेल्वे फाटकासमोर कंटेनर, जीप व टेंपो या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात पाच जण ठार, तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींवर कोकमठाण (ता. येवला) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येतात. हैदराबाद येथील बारा साईभक्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपने शिर्डीला जात होते. महामार्गावर अंचलगाव येथील रेल्वे फाटकाजवळील वळणावर सकाळी सव्वानऊच्या सुमारास एका कंटेनरने (युके 04, डीए 9491) जीपला (एमएच 15, ई 4803) जोरदार धडक दिली. हा त्याचवेळी तेथून जाणाऱ्या टेंपोलाही (एमएच 17, डी 3403) कंटेनरने धडक दिली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना तत्काळ येवला ग्रामीण रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले; मात्र तेथे उपचार सुरू असताना आणखी दोघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरचालकाने तेथून पळ काढला.

मृतांमध्ये गाडीचे चालक शिवाजी लक्ष्मण मांजरे (वय 35, रा. बुंदेलपुरा, येवला) यांच्यासह मन्नमा गुंडापुरी (वय 53, रा. लिंकमपल्ली, ता. नालगोंडा, आंध्र प्रदेश), चेंजरम्मा गोविंद राधावल (रा. पनकापालेम, जि. प्रकाशम), व्यंकमय्या लक्ष्मिनारायण कलिकट्टम (वय 34, रा. जोडामेंटला, कुतुबबुलपूर, तेलंगणा) यांचा समावेश असून, आणखी एका मृत महिलेची (वय 30) ओळख पटलेली नाही. शिवशंकर गुंडापुरी, त्यांची पत्नी स्वप्ना, मुलगा उदय, तसेच नागराणी पोलपाली, नरेश पोलपाली, लक्ष्मण नारायण, के. चंद्रमला हे सात जण जखमी झाले आहेत.

Web Title: yeola nashik news 5 death in accident