ग्रामस्थांच्या घशाला कोरड तरी जिल्हाधिकाऱ्यांना फुटेना पाझर

संतोष विंचू
शनिवार, 31 मार्च 2018

येवला- या वर्षी तालुक्याच्या अवर्षणप्रवण असलेल्या उत्तरपूर्व भागात वरूणराजाने अपकृपा केल्याने डिसेंबरपासूनच या भागातील जलसाठे कोरडे झाले आहे. आजमितीस तर थेंबभर पाण्यासाठी या भागातील ग्रामस्थ आसुसलेले आहे. पाण्याच्या शोधात दिवसभर भटकंतीची वेळ येत आहे. त्यातच टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव मंजुरीला जिल्हाधिकार्याकडून महिना-दिड महिन्याचा कालावधी लावला जात असल्याने या गावातील टंचाईची दाहकता अधिकच गंभीर झाली आहे.

येवला- या वर्षी तालुक्याच्या अवर्षणप्रवण असलेल्या उत्तरपूर्व भागात वरूणराजाने अपकृपा केल्याने डिसेंबरपासूनच या भागातील जलसाठे कोरडे झाले आहे. आजमितीस तर थेंबभर पाण्यासाठी या भागातील ग्रामस्थ आसुसलेले आहे. पाण्याच्या शोधात दिवसभर भटकंतीची वेळ येत आहे. त्यातच टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव मंजुरीला जिल्हाधिकार्याकडून महिना-दिड महिन्याचा कालावधी लावला जात असल्याने या गावातील टंचाईची दाहकता अधिकच गंभीर झाली आहे.

पाऊस पडला तर उन्हाळा सुसह्य नाहीतर डिसेंबरमध्येच गावे पाण्यासाठी पारखी होत असल्याचे चित्र तालुक्यात असते. यावर्षी असेच झाले असून, पावसाने पश्चिम भागाला आधार देतांना उत्तर पूर्व भागाला झुलत ठेवले होते. याचमुळे डिसेंबर पासूनच उत्तर पूर्व भागात पाणीबाणी निर्माण झाली आहे. गाव परिसरातील पाणी आटल्याने मिळेल तेथून शोधाशोध सुरू झाली आहे.

अशी परिस्थिती असताना देखील टँकरच्या प्रस्तावाविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी पहिल्यापासूनच नकारात्मक पवित्रा घेतला असून, जानेवारीत माजी सभापती संभाजी पवार, बाजार समितीचे संचालक कांतीलाल साळवे आदींच्या शिष्टमंडळाने तर मार्च शिवाय टँकर मिळणार नाही असे स्पष्टपणे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनी त्यांनी येवल्याच्या टँकरचा प्रस्ताव मंजूर केला तर दुसऱ्या टप्प्यातील प्रस्ताव अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयातच धूळ खात असल्याने दीड महिन्यापर्यंत कालावधी लोटला तरी अनेक टंचाईग्रस्त गावांना अद्यापही पाणी पुरवठा सुरू झालेला नाही. आजमितीस सुमारे सोळा गावांना टँकरची गरज असून, त्यांचे प्रस्ताव लालफितीच्या कारभारात अडकले आहे. यामुळे थेंबभर पाणी नसलेल्या या गावातील सुमारे तीस ते पस्तीस हजार ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. 

ग्रामपंचायत परिस्थितीनुसार प्रस्ताव पाठवते. तहसीलदार नरेशकुमार बहिरम आणि गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांनीही मुदतीत गावांची पाहणी करून प्रस्ताव प्रांताकडे तर प्रांताधिकाऱ्यांनी शिफारस करून हे प्रस्ताव तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत. मात्र यावेळी पाण्यासाठी होणाऱ्या वणवणीचा विचार न करता जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रस्तावांना फाईल बंद ठेवल्याने गावोगावी महिला व पुरुषांची पाण्यासाठीची हाल वाढत्या उन्हासोबत अधिकच गंभीर होत आहे.

प्रस्ताव जानेवारीत अजून टँकर नाही...!
पालखेड डाव्या कालव्याच्या लाभातील गावांना तसेच ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या लाभार्थी गावांना यंदा टंचाई जाणवणार नाही मात्र तालुक्याच्या उत्तर-पूर्व गावांना डिसेंबर महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. डिसेम्बर व जानेवारी महिन्यात आहेरवाडी, कुसमडी ,खैरगव्हान, गोपाळवाडी (खैरगव्हान),
चांदगाव, कासारखेडे, बाळापूर, पिंपळखुटे तिसरे या ८ गावांचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेल्यावर ३ मार्चला म्हणजे अडीच महिन्यानंतर या आठ गावाचे टँकर जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुर केले आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ममदापुर गावाचा २९ जानेवारी रोजी, गुजरखेडा गावाचा ९ फेब्रुवारी, कोळगाव व वाईबोथी या दोन गावांचे प्रस्ताव २५ फेब्रुवारी रोजी प्रांताधिकाऱ्यांकडे दाखल झाले होते. त्यांनी ते तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीला पाठवले. मात्र हे प्रस्तावही सुमारे एक ते दीड महिन्यांनी दोन दिवसांपूर्वी मंजूर केले आहेत. मात्र ही मंजुरी कागदावर असून, टँकर न मिळाल्याने अजून या गावांना पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.

आजमितीला खिर्डीसाठे, लहित, अनकाई, वसंतनगर, गोरखनगर, सोमठाणजोश, राजापूर, भुलेगाव, पांजरवाडी, आडसुरेगाव तळवाडे (शिवाजीनगर), रेंडाळे,गारखेडे, सायगाव (महादेववाडी), ममदापूर (ताडावस्ती), निळखेडे, गणेशपूर या गावांतील ग्रामस्थांना मात्र टँकरची प्रतीक्षा असून, पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे. बल्हेगाव, वडगाव, चिचोंडी खुर्द आदी गावांना प्रशासनाने बोअरवेल्स मंजूर केलेले आहेत.

'यापूर्वी टँकरच्या प्रस्तावांना कधीही इतका कालावधी लागला नाही या वर्षी गावोगावी पाणीच नाही त्यातच प्रस्तावही रखडले गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. स्थानिक परिस्थिती गंभीर असल्याने टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत"
आशा साळवे,सभापती,पंचायत समिती,येवला 

Web Title: yeola people waiting for district collectors approval for water tanker