"यिन'तर्फे गरिबांना मिळाली मायेची ऊब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

जळगाव - वंचितांची गरज ओळखून "सकाळ माध्यम समूहा'च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या (यिन) सदस्यांतर्फे आज पॉवर हॉसिंगजवळील तंट्या भिल झोपडपट्टी, हुडको भागातील वस्त्यांत जाऊन गरजूंना मायेची ऊब मिळावी, यासाठी जुन्या कपड्यांचे वाटप करण्यात आले. थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे मिळाल्याने यावेळी गरजूंच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडताना दिसून आला.

जळगाव - वंचितांची गरज ओळखून "सकाळ माध्यम समूहा'च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या (यिन) सदस्यांतर्फे आज पॉवर हॉसिंगजवळील तंट्या भिल झोपडपट्टी, हुडको भागातील वस्त्यांत जाऊन गरजूंना मायेची ऊब मिळावी, यासाठी जुन्या कपड्यांचे वाटप करण्यात आले. थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे मिळाल्याने यावेळी गरजूंच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडताना दिसून आला.

शहरातील आर्ट ऑफ लिव्हिंग व यिन सदस्यांचे गेल्या पंधरा दिवसांपासून जुने कपडे जमा करण्यासाठी हात झटत होते. या दरम्यान जुने कपडे जमा करण्यासाठी "यिन'च्या काही सदस्यांनी सोशल मीडियाचाही वापर केला. या सोशल मीडियाद्वारे त्यांनी अनेक लोकांपर्यंत आपल्या उपक्रमाची माहिती पोहोचविली व त्यातूनच हजारोंच्या संख्येने जुने कपडे जमा केले. नेरी नाका परिसरातील तसेच हुडको भागातील कुटुंबीयांना या कपड्यांचे वाटप करण्यात आल्याने लहान मुलांसह सर्वांनीच या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. यावेळी "यिन'चे पालकमंत्री पीयूष पाटील, सदस्य रितेश चौधरी, निखिल पोपटानी, मनीष हिंगोले, नीर जैन, निखिल आखडकर, अक्षय जैसवाल, कुणाल कोडंबे, प्रवीण राजपाल, भगवान पाटील, चैतन्य काजळे, पवन सपकाळे, सोज्वल पाटील उपस्थित होते.

मनपसंत कपड्यांची निवड
या उपक्रमाची माहिती आधीच परिसरात दिली गेली असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. यावेळी प्रत्येकाने आपल्या आवडीचे कपडे निवडले. लहान मुलांना रंगबिरंगी आपल्या आवडीचे कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

 नागरिकांचे बोल...
भास्कर मोरे ः सध्या थंडीचा जोर वाढला असून, "यिन' सदस्यांनी आम्हाला या उपक्रमाद्वारे मायेची ऊब दिली आहे. प्रथमच अशा स्वरूपाचा उपक्रम आम्हास अनुभवायला मिळाल्याने आनंद वाटतोय.

शांताबाई तायडे ः पैशांअभावी मी माझ्या मुलांना कपडे देऊ शकत नव्हती. मात्र, "यिन' सदस्यांनी पालकांप्रमाणे मुलांना कपडे दिल्याने समाधान वाटले. यावेळी माणुसकीचे दर्शन घडले.

सरस्वतीबाई गवई ः गरीब परिस्थितीमुळे स्वेटर घेणे परवडत नाही. मात्र, या उपक्रमाद्वारे आम्हाला थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपडे मिळाल्याने आनंद वाटला. प्रथमच आमच्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला आहे.

रेखा सोनवणे ः अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजा असल्याने आज कपड्यांचे वाटप करून "यिन' सदस्यांनी आमची गरज पूर्ण केली आहे. या उपक्रमामुळे माणुसकी अजूनही जिवंत आहे, हे सिद्ध झाले आहे.

बशीर खान ः घरात म्हातारी व्यक्ती असल्याने त्यांच्याकडून थंडी सहन होत नाही. मात्र, "यिन'च्या सदस्यांनी या उपक्रमाद्वारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गरम कपडे दिल्याने दिलासा मिळाला.

Web Title: Yin by the poor distribution of old clothing