आपण सर्वांनी मिळून बदलू या शहराचे चित्र - आमदार हिरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

नाशिक - देशात स्त्रियांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्त्रीभृण हत्या असो व अन्य घटनांमध्ये पुरुषांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. समाजकारणासह राजकारणातही महिला मोठ्या प्रमाणावर आघाडीवर आहेत. ही समाधानाची बाब असून त्याद्वारे सर्व महिलांनी एकत्र येऊन शहराचे चित्र बदलू या, असे आवाहन आमदार सीमा हिरे यांनी आज येथे केली. 

नाशिक - देशात स्त्रियांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्त्रीभृण हत्या असो व अन्य घटनांमध्ये पुरुषांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. समाजकारणासह राजकारणातही महिला मोठ्या प्रमाणावर आघाडीवर आहेत. ही समाधानाची बाब असून त्याद्वारे सर्व महिलांनी एकत्र येऊन शहराचे चित्र बदलू या, असे आवाहन आमदार सीमा हिरे यांनी आज येथे केली. 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीतर्फे समाजात वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सातपूरच्या निमा हाऊसमध्ये गौरव करण्यात आला. तसेच स्त्रियांची यशोगाथा सांगणाऱ्या "वुमेन ऑयकॉन' या पुस्तिकेचे प्रकाशनही या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, युनिट व्यवस्थापक राजेश पाटील या वेळी उपस्थित होते. 

समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या रोहिणी नायडू, नेहा खरे, दिलशान हमीद, नीता आरोरा, अश्‍विनी न्याहारकर, शरण्या शेट्टी, डॉ. भारती बागूल, मनीषा बागूल, विजयंता आधारकर, सोनाली दगडे, नीता द्विवेदी, सपना आहेर, उमा बच्छाव, मनीषा पवार, वैशाली राठोड, प्रीती पाटील, यशश्री पवार, हेमांगी पाटील, मनीषा धात्रक, आशालता देवळीकर, योगिता हिरे, प्रेरणा बलकवडे, स्वाती जैन, रश्‍मी हिरे, एलिझाबेथ मेस्त्री, नगरसेविका वत्सला खैरे आदी महिलांचा "सकाळ'तर्फे गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. 

श्रीमंत माने म्हणाले, की आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्याद्वारे महिलांनी सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. स्त्रियांच्या आर्थिक उन्नतीत मोठे योगदान देणाऱ्या विविध बचतगटांनी केवळ तांत्रिक बाबीत न अडकता बचतगटांनी खऱ्या अर्थाने "उत्पादक' बनावे, असा सल्ला दिला. चाळीशीनंतर महिलांमध्ये भेडसावणाऱ्या आरोग्याच्या विविध प्रश्‍नांवर एकत्र काम करण्याची निकडही त्यांनी व्यक्त केली. "सकाळ'चे युनिट व्यवस्थापक राजेश पाटील यांनी प्रास्ताविकात उपक्रमामागील भूमिका विशद केली. मधुरांगणच्या संयोजिका चंद्रमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी समाजाच्या विविध क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत असलेल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

राजकारणात चांगल्या गोष्टी व सकारात्मकता वाढण्यासाठी महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे. चांगल्या व सुसंस्कृत महिलांचा राजकारणातील टक्का वाढल्यास लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठी ते महत्त्वाचे पाऊल ठरेल.
- रोहिणी नायडू, महिला शहराध्यक्षा, भाजप

शिक्षणामुळे स्त्रियांमधील आत्मविश्‍वास वाढतो. प्रत्येकात उपजत अनेक गुण असतात. मात्र, स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी खऱ्या अर्थाने स्वावलंबन, आत्मविश्‍वास व शिक्षण हे आधुनिक सौंदर्याचे पॅरामीटर बनावेत.
- हेमांगी पाटील, प्रादेशिक अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळ

काही काळापूर्वी लघुउद्योगांसाठी बॅंकांनी कर्ज दिल्यावर पुढील तीन महिन्यांसाठी एनपीए (अनुत्पादक कर्ज) दिले जात असे. परंतु, आता तीन महिन्यांचा हा कालावधी सहा महिन्यांचा करण्यास केंद्रीय सूक्ष्म व लघुउद्योगमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. या उद्योगांसाठी हे अतिशय सकारात्मक पाऊल आहे.
- मनीषा धात्रक, उद्योजिका

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून भगूरसह जिल्हाभरात महिलांचे बचत गट स्थापन केले. आज मातीही विकली जात असल्याने महिलांनी अधिकाधिक रोजगाराक्षम बनावे. महिलांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा.
- प्रेरणा बलकवडे, जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस

Web Title: You change the image of this city all together